अकोला : एकच गुन्हेगार वारंवार गुन्हे करून समाजासाठी घातक ठरत असतो. त्यामुळे गुन्ह्यांचा आलेख चढत जाऊन सातत्याने गुन्हे घडतात. या अट्टल गुन्हेगारांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांचा मागावा घेण्यासाठी अकोला पोलीस दलाने त्रिनेत्र प्रणाली विकसित केली. ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे तयार करण्यात आलेला देशातील या प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प ठरला आहे. गेल्या १० वर्षांतील दोन हजारावर गुन्हेगारांच्या माहितीचे अद्ययावतीकरण झाले.
त्या गुन्हेगारांवर लक्ष ठेऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जाणार असल्याने गुन्हेगारी झपाट्याने कमी होईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी ‘लोकसत्ता’शी बोलतांना दिली.
पथदर्शी प्रकल्प म्हणून पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते ‘त्रिनेत्र’चे लोकार्पण करण्यात आले. सुमारे ७० टक्के गुन्हेगार अनेकवेळा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असतात. गुन्ह्यात पकडल्यावर न्यायालयाद्वारे गुन्हेगारांना शिक्षा होते. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते. मात्र, कारागृहातून बाहेर आल्यावर ते पुन्हा गुन्हेगारी कृत्याकडे वळतात. या अट्टल गुन्हेगारांवर लक्ष ठेऊन त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे गेल्या १० वर्षांत जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांतर्गत वारंवार गुन्हे करणारे किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे नोंद असलेल्या गुन्हेगारांच्या माहितीचे संकलन करण्यात आले. त्याचे वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये वर्गीकरण केले.
गुन्ह्यांसह गुन्हेगारांची इतर माहिती एकत्रित करून त्रिनेत्र प्रकल्पाच्या अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे त्यावर प्रकिया केली जात आहे. ती माहिती संबंधित पोलीस ठाण्यांना पाठवून त्या गुन्हेगारांवर प्राधान्याने लक्ष ठेवण्याचे सूचित करण्यात आले. अट्टल गुन्हेगारांचा मागोवा ठेवता येणे शक्य होणार आहे. परिणामी, भविष्यात घडणारे गुन्हे रोखता येतील. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत होईल. ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘त्रिनेत्र’ प्रणाली तयार झाली. गुन्हेगारी रोखण्यासाठी ही प्रणाली निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी व्यक्त केला.
गुन्हेगारांचे पुनर्वसन होणार
वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष ठेऊन त्यांची पार्श्वभूमी जाणून घेतली जाणार आहे. ते गुन्हेगारी प्रवृत्तीकडे का वळले? याची माहिती घेतली जाईल. थोड्या पैशांसाठी सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात. सामाजिक संस्थांच्या मदतीने गुन्हेगारांचे समुपदेशन केले जाणार आहे. पुनर्वसन करण्यासाठी त्यांना नोकरी मिळवून देण्याचे सुद्धा प्रयत्न केले जातील, असे अर्चित चांडक यांनी सांगितले.