नागपुरातील गुंडगिरी- भाग १

एकेकाळी महाविद्यालय राजकारणात असलेले अनेक युवक आज नागपूरच्या दक्षिण-पूर्व भागातील कुख्यात गुंड म्हणून उदयास आले आहेत. राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने दक्षिण-पूर्व भागात गुंडगिरी फोफावत गेली. आज शहरातील प्रमुख गुंडांपैकी काहींची नावे याच भागातून येतात.
पूर्व नागपुरातील अनेक युवक गुंडगिरीकडे वळण्यासाठी महाविद्यालयातील राजकारण कारणीभूत ठरले. मधु देशमुख नावाचा विद्यार्थी हा सक्करदरा चौकातील प्रसिद्ध विज्ञान महाविद्यालयातून विद्यापीठ आणि महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये मधुसूदन पॅनेल लढवित होता. या पॅनलमधून त्याने युवकांचे मोठे टोळके तयार केले. या टोळक्याची बैठक दररोज संगम सिनेमागृहाजवळ होत होती. दरम्यान संगम सिनेमागृहाजवळ काही युवक तिकिटे काळ्या बाजारात विकायचे. त्यामुळे मधुसूदन पॅनलमधील काही युवक तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्यांच्या संपर्कात आले. तिकिटांच्या काळ्या बाजारामुळे खिशात पैसा खुळखुळत असल्याने मधु देशमुख आणि कंपनी गुन्हेगारीच्या मार्गाकडे वळली. हळूहळू त्यांनी वसुलीचे काम सुरू केले. गुन्हेगारीच्या क्षेत्रात चांगला पैसा मिळत असल्याने त्यांच्यातील काहीजण कुख्यात गुंड म्हणून कुप्रसिद्ध झाले. कालांतराने वर्चस्वावरून त्यांच्यात खुनी संघर्षही उफाळला. या संघर्षांत एक-एक करीत अनेकांचा ‘गेम’ झाला. शरद देशमुख, अशोक भोयर, शमशेर, सुभाष शाहू, अनिल धावडे, हरिश्चंद्र धावडे, भरत मोहाडीकर, प्रकाश झलके, अश्विन वारिया, जावेद-साजिद, राजू रजवाडे, संजी रजवाडे, संजय अवतारे, मारोती नव्वा आणि राजू भद्रे ही नावे पूर्व नागपुरातील आजच्या गुन्हेगारी क्षेत्रात घेतली जातात. आज नागपुरात जमिनीचे दर गगनाला भिडले असल्याने मालमत्तेच्या धंद्यात रग्गड पैसा आहे. त्यामुळे एकेकाळी हप्ता वसुली, चोरी-लुटपाट अशा कामांत असलेले अनेकजण आज शस्त्राच्या धाकावर वादग्रस्त जागेची विल्हेवाट लावण्याचे काम करतात. संपूर्ण विदर्भात त्यांचे नेटवर्क पसरले असल्याची माहिती आहे.
या भागातील खुनी संघर्ष हा राजू रजवाडे याच्या खुनापासून सुरू होतो. राजू रजवाडे याच्या खुनात मधु देशमुख याच्या टोळीचे नाव समोर आले होते. तर शमशेरचा भाऊ इसा याचा खून रजवाडे बंधूंनी केला होता. याचा वचपा काढण्यासाठी संजू रजवाडे याचा बैद्यनाथ चौकात निर्घृण खून करण्यात आला. मधु देशमुख आणि सुधाकर डोये यांचा खून विहिरगाव येथे अशोक पहेलवानच्या टोळीने केला. त्यानंतर मधुचा भाऊ शरद देशमुख गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला. त्याने शमशेर, बबलू, महेश, भगत, महाडिक यांना सोबत घेऊन टोळी तयार केली. काही दिवसांत अशोक पहेलवाल यालाही संपविण्यात आले.
शरद देशमुखचे वर्चस्व वाढत असताना मारोती नव्वा, जाकीर पठाण आणि त्यांच्या साथीदारांनी सक्करदरा परिसरात शरद देशमुखला संपविले. या खुनामागे राजू भद्रे असल्याचा आरोप होत होता. या घटनेपासून राजू भद्रे चर्चेत आला. राजू भद्रे आणि त्या साथीदारांनी जमिनीच्या वादातून पिंटू शिर्के याचा न्यायालयात खून केला. या घटनेने भद्रे आणि टोळी राज्यभरात चर्चेत आली. पिंटू शिर्के खून प्रकरणात राजू भद्रे आणि त्याच्या साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा झाली. उच्च न्यायालयानेही त्यांची शिक्षा कायम ठेवली असून आता तो फरारी आहे.
मोठा ताजबाग परिसरात अबू उर्फ फिरोज खान अजीज खान उर्फ पप्पू पहेलवार याची दहशत आहे. अफजल खान याच्या वडिलांनी अबूच्या वडिलांचा खून केला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी अबू आणि त्याच्या तीन भावांनी अफजलच्या वडिलांचा खून केला. त्यानंतर अबू आणि त्याचे भाऊ गुन्हेगारी क्षेत्रात आले. अबूचा एक भाऊ आता कारागृहात आहे. याच भागात अफजल खान उर्फ इकबाल खान टोळीचेही वर्चस्व आहे. नवखा चपटय़ा उर्फ राहुल चंद्रभान मेश्राम याचे याच काळात गुन्हेगारी कारवायांत आगमन झाले.
कुख्यात दिलीप कोसरकर आणि मित्र परिवाराने राहुल चपटय़ाचा कारच्या धडकेत गेम केला.

राजू भद्रेला काँग्रेसी नेत्यांचे पाठबळ!
राजू भद्रे याने पूर्व आणि दक्षिण नागपुरात आपली दहशत निर्माण केली आहे. राजू भद्रे नावाची टोळीही गुन्हे शाखा पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. या टोळीच्या पाठीमागे काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे हात असून, त्यात प्रामुख्याने माजी महापौर आणि माजी खासदारांचे नाव वेळोवेळी समोर आले आहे. अनेक कार्यक्रमाच्या ठिकाणी राजू भद्रे आणि ते एकत्र दिसले आहेत.

गुंडांच्या निर्मितीत धावडे बंधुंचा हात
नागपूरच्या गुन्हेगारीच्या क्षेत्रात हरिश्चंद्र धावडे आणि अनिल धावडे या दोन भावंडांचे नाव मोठय़ा आदराने घेतले जाते. नागपुरात आज कार्यरत असलेल्या अधिकाधिक गुंडांना हरिश्चंद्र धावडे यांनी तयार केल्याची माहिती आहे. त्यामुळे गुन्हेगारीच्या क्षेत्रात तेढ निर्माण झाल्यास हरिश्चंद्र धावडे यांच्या मध्यस्थीने प्रकरण सोडविण्यात येते. परंतु शारीरिक गुन्हे करण्यापेक्षा धावडे बंधू हे जुगार आणि सट्टा व्यवसायात खूश आहेत. उपराजधानीतील एक भागही धावडे मोहल्ला नावाने ओळखला जातो.