राजीनामा सत्रानंतर असंतोष उफाळला
मंगेश राऊत, लोकसत्ता
नागपूर : शहरात शिवसेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असून त्याविरुद्ध पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दुसरीकडे शिवसेनेत शहरात महत्त्वाची पदे देण्यात आलेल्या अनेकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर येत आहे.
विधानपरिषद आमदार दुष्यंत चतुर्वेदी आणि शहरप्रमुख प्रमोद मानमोडे यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील विभागनिहाय कार्यकारिणी जाहीर केली.
यात जुन्या शिवसैनिकांना डावलून पक्षांतर केलेल्यांना अधिक महत्त्वाची पदे देण्यात आली व निष्ठावाना शिवसैनिकांना पदावनत करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. आमदार चतुर्वेदी यांचे कुटुंब काँग्रेसी असल्याने ते उपराजधानीतील शिवसेनेचे काँग्रेसीकरण करीत असल्याची टीकाही होत असून दोन दिवसांपूर्वी तीन माजी शहर प्रमुखांसह जवळपास २०० शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामा दिला.
यावरून शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमधील असंतोष उफाळून आला असून अद्याप तो शमलेला नाही, हे स्पष्ट होत आहे.
गुन्हा सिद्ध होईपर्यंत गुन्हेगार नाही
काही पदाधिकाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची मला कल्पना नाही. पण, आरोप झाला म्हणून गुन्हेगार होत नाही. गुन्हा सिद्ध होऊन त्याला शिक्षा झाली तर तो गुन्हेगार असतो. अशा व्यक्तींना आम्ही पद दिलेले नाही. राजकारणातील व्यक्तींवर अनेकप्रकारचे आरोप होत असतात व गुन्हे दाखल होतात. यातून बडे नेतेही सुटलेले नाहीत.
– आमदार दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना.