शिवसेना पूर्व नागपुरात बळकट होत असल्याने जिल्हा उपाध्यक्ष रवनीश पांडे ऊर्फ चिंटू महाराज यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय सुडबुद्धीने झालेला प्रकार आहे, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व माजी खासदार प्रकाश जाधव यांनी आज शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी रवनीश पांडे, माजी नगरसेवक अजय दलाल उपस्थित होते.
एकाने घर बांधकामासाठी वाळू खरेदी केली असता कमी वाळू मिळाली. त्याला देयक देखील देण्यात आले नाही. त्या व्यक्तीने याची तक्रार शिवसेनेकडे केली. पांडे यांनी यात लक्ष घातल्यानंतर वाळू चोरीचा प्रकार समोर आला. वाळूचा ट्रक पकडून पोलिसांना देण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी पांडे आणि कार्यकर्त्यांना नंतर बोलावू असे सांगितले. नंतर पोलिसांनी ट्रक मालकाकडून तक्रार घेऊन पांडे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखला केला. पोलीस, आरटीओ आणि जिल्हा प्रशासनाला रात्रभर वाळू चोरी असल्याचे दिसत नाही. याचे कारण सगळ्यांचे ‘हप्ते’ बांधलेले आहेत, असा आरोपही जाधव यांनी केला. मौदा येथील ठाणेदारांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असेही सांगितले. शिवसेनेने पूर्व नागपुरात स्मार्ट सिटी असो वा जनतेचे इतर प्रश्न असो त्यावर आंदोलन केले आहे. येथे शिवसेना बळकट होत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना खंडणीच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. जी ध्वनीफित व्हायरल करण्यात आली त्यामध्ये बोलत असलेल्या राजा खानला समोर आणावे, अशी मागणीही जाधव यांनी केली.
सहाही जागांवर तयारी
पूर्व नागपुरात पक्ष मजबूत स्थितीत आहे. विधानसभेसाठी येथून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. तसेच शहरातील इतर पाच मतदार संघात विजयी झालो नाही तरी प्रमुख उमेदवाराला पाडण्याच्या स्थितीत आहोत. सध्यातरी सर्व सहाही जागांवर तयारी करीत आहोत, याकडेही जाधव यांनी लक्ष वेधले