करोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका!
नागपूर : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने टाळेबंदी जाहीर केली. पाचपेक्षा अधिक लोकांनी गोळा होऊ नये म्हणून पोलिसांनी संचारबंदीही लागू केली होती. गेली अडीच महिने रस्त्यावर वाहतूक नव्हती व सिग्नलही बंद होते. पण, आता हळूहळू व्यापारपेठ उघडू लागली असून सिग्नलही सुरू झालेत. पण अनेक ठिकाणी सिग्नल सुरू होताच चौकाचौकात भिकाऱ्यांचीही गर्दी दिसू लागली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ मार्चपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर शहरात संचारबंदी जाहीर झाली. त्यामुळे पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकत नव्हते. व्यापारपेठा बंद, वाहतूक व्यवस्था बंद असल्याने शहरातील रस्ते अडीच महिने सुनसान होते. आता सरकारकडून टाळेबंदी उठवण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यात येत आहे. बाजारपेठाही उघडत आहेत. आपापसात अंतर राखून वाहतूक व्यवस्थाही सुरू झाली. रस्त्यांवर पूर्वीप्रमाणे वाहनांची गर्दी झाली व वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांना सिग्नल सुरू करावे लागले. सिग्नलवर वाहने उभी राहताच भीक मागणारे भिकारी पुन्हा चौकाचौकात उभे दिसत आहेत. पण, टाळेबंदीच्या काळात हे भिकारी कुठे होते, असा प्रश्न सर्वाना पडला आहे.
‘महापालिकेसोबत मिळून कारवाई करू’
भिकाऱ्यांविरुद्ध भीक मागणे प्रतिबंधक कायद्यान्वये प्रतिबंधक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात येईल. भिकाऱ्यांमुळे करोनाचा संसर्ग होऊ शकत असल्यास महापालिकेच्या पथकाची मदत घेण्यात येईल.
– गजानन राजमाने, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.