scorecardresearch

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या ‘हात की सफाई’ ने ग्राहकांची लूट; दिलेल्या पैशाचा पूर्ण मोबदला नाही; तपासणी यंत्रणेचे दुर्लक्ष

एकीकडे पेट्रोलचे दर वाढत असताना दुसरीकडे  पेट्रोल पंपावरील कर्मचारी हातचलाखी करीत वाहनात कमी पेट्रोल भरत असल्याचे प्रकार शहरातील अनेक पेट्रोल पंपावर उघडकीस आले आहेत.

नागपूर : एकीकडे पेट्रोलचे दर वाढत असताना दुसरीकडे  पेट्रोल पंपावरील कर्मचारी हातचलाखी करीत वाहनात कमी पेट्रोल भरत असल्याचे प्रकार शहरातील अनेक पेट्रोल पंपावर उघडकीस आले आहेत. महागाईमुळे पिचल्या गेलेल्या ग्राहकांची दोन्ही बाजूंनी लूट होत असून संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

नागपूर शहरात जवळपास ३०० पेट्रोल पंप असून त्याद्वारे दिवसाला एक ते दीड लाख लिटर पेट्रोलची विक्री होते. सध्या पेट्रोलचे दर वाढत असल्यामुळे वाहनधारक त्रस्त आहेत. त्यातही पेट्रोल पंपवरील कर्मचारी ग्राहकांना त्याने दिलेल्या पैशाइतकेही पेट्रोल देत नाही. तेथे  त्याची फसवणूक केली जाते. गाडीत पेट्रोल भरताना कर्मचारी कमी पेट्रोल देतात. ही ‘हात की सफाई’ ग्राहकाच्या लक्षात सुद्धा येत नाही इतक्या सफाईदारपणे  केली जाते. 

विषम संख्येत पेट्रोल भरा

अनेक वाहनचालक थेट ५००, १००० आणि २००० अशा पूर्ण आकडय़ातील रक्कमेचे  पेट्रोल भरतात. पूर्ण रक्कमेत मीटर ‘सेट’ केल्या जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे पेट्रोल भरताना ४९९ किंवा ९९५ अशा विषम आकडय़ात पेट्रोल भरल्यास फसवणुकीची शक्यता कमी असते. 

अशी होते पेट्रोल चोरी

अनेक कर्मचारी वाहनात पेट्रोल भरताना ग्राहकांना गप्पांमध्ये गुंतवून ठेवतात आणि सांगितलेल्या रकमेऐवजी कमी पैशाचे पेट्रोल भरतात. वाहनधारकाच्या लक्षात येण्यापूर्वीच होस पाईप (पेट्रोल टाकण्याचा पाईप) पंपला लावून मीटर शून्यावर नेऊन ठेवतात. त्यामुळे वाहनधारकांच्या हा प्रकार लक्षात येत नाही. तर काही पंपवरील कर्मचारी दोन मशीनवरील होस पाईप एकमेकांत गुंतवून ठेवतात. होसपाईप एका मशीनचा आणि पेट्रोल सेट केल्या जाते दुसऱ्या मशीनवरून, अशाप्रकारे पेट्रोलची चोरी केली जाते.  तसेच मीटर सेट न करता पेट्रोल भरताना कर्मचारी चलाखी करतात. हाताला झटका देणे, मध्ये-मध्ये पेट्रोल भरणे थांबवणे हे ‘हात की सफाई’चेच प्रकार आहेत. यामुळे कमी दाबाने पेट्रोल भरले जाते. घाईत असलेले नोकरदार, महिला आणि कारचालक ग्राहक पंपावरील कर्मचाऱ्यांच्या लुटीचे बळी ठरतात.

‘होस’ पाईप पारदर्शी असावा

पेट्रोल पंपवरील इंधन भरण्याचा पाईप काळय़ा रंगाचा असतो. तसेच तो लांब असतो. मीटर सेट करून इंधन भरल्यानंतरही पाईपमध्ये पेट्रोल शिल्लक असते. पाईप काळय़ा रंगाचा असल्यामुळे न भरल्या गेलेले पेट्रोल दिसत नाही. तसेच कर्मचारी लगेच वाहनाच्या टाकीतून बाहेर पाईप काढतो. त्यामुळे कमी पेट्रोल मिळते.

चोरीसाठी मीटरमध्ये चीप

पेट्रोल चोरी करण्यासाठी पंपमालक अनेकदा मीटरमध्ये चीप लावत असल्याचे प्रकार काही वर्षांपूर्वी उघडकीस आले होते. काही पंपात चीप आढळल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यावेळी नागपुरातीलही काही पंपावर पोलिसांचे छापे घालण्यात आले होते. काही दिवसानंतर मात्र अचानक छापे पडणे बंद झाले आणि तेव्हापासून चीप सापडणेही बंद झाले होते. अनेक पेट्रोल पंप अजूनही जुन्या तंत्रज्ञानावर चालत आहेत, ज्यामध्ये हेराफेरी करणे खूप सोपे आहे. त्यामुळे पेट्रोल नेहमी डिजिटल मीटरच्या पंपावरच भरावे. याचे कारण जुन्या पेट्रोल पंपावरील मशीन्सही जुनी असल्याने या मशीनवर कमी पेट्रोल भरण्याची भीती अधिक आहे.

म्हणून कर्मचाऱ्यांना कमी मोबदला

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना जेमतेम ५ ते ७ हजार रुपये महिन्याला कामाचा मोबदला मिळतो. त्यामुळे ते ग्राहकांच्या पेट्रोलची चोरी करतात. दिवसभरातील ‘वर’ कमाई सर्व कर्मचारी समान भागात वाटून घेतात, अशी कबुली पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

ग्राहकांनी स्वत: जागरूक राहायला हवे

पेट्रोल भरताना ग्राहकांनी जागरूक असावे. मीटरवरील शून्य बघूनच पेट्रोल भरायला सांगावे. कोणत्याही ग्राहकाला पेट्रोल कमी भरल्याची शंका असल्यास त्याला थेट लेखी तक्रार नोंदवण्याचे अधिकार आहेत. कुणी दोषी आढळल्यास त्यावर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. सध्या डिजीटल पेट्रोल पंप असल्याने कमी पेट्रोल भरण्याची शक्यता नाही. 

– प्रणय पराते, माजी सचिव, विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Customers robbed petrol pump hand cleaning money ignoring inspection mechanism ysh

ताज्या बातम्या