कधी पूल कोसळणे तर कधी उद्घाटनाचा वाद अशा विविध कारणांमुळे समृद्धी महामार्ग कायम चर्चेत असताना आता या महामार्गावरील नारंगवाडी टोल नाका परिसरात हरणांची शर्यत दिसून आली.
मागील दोन दिवसांपासून या हरणांच्या शर्यतीची चित्रफीत समाजमाध्यमांवर झळकत आहे आणि त्यावर गमतीशीर प्रतिक्रिया देखील येत आहेत. तसेच, यामुळे समृद्धी महामार्गातील प्राण्यांसाठी केलेल्या उपाययोजनेतील त्रूटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या मदतीने ७०० किलोमीटर पैकी सुमारे ११५ किलोमीटरवर वन्यप्राण्यांचा अधिवास असणाऱ्या ठिकाणी शमन उपाययोजना करून घेतल्या. त्या खरेच गांभीर्याने करून घेतल्या का? त्यांची गांभीर्याने अंमलबजावणी झाली का? असे प्रश्न ही चित्रफीत समोर आल्यानंतर निर्माण झाले आहेत.
नारंगवाडी टोल नाका परिसरातून हरणं या महामार्गावर चढले आणि पुलगाव टोल नाक्यापर्यंत ते धावत सुटले. आता आपल्यासाठी वेगळे मार्ग तयार करण्यात येत आहेत, हे त्या बिचाऱ्या हरणांना काय ठाऊक? पण या महामार्गावर वाहतूक अजून सुरू झाली नाही म्हणून बरे, नाही तर या मुक्या जीवांचा १०० ते १५० च्या गतीने जाणाऱ्या वाहनाखाली नक्कीच चुराडा झाला असता. काही महिन्यांपूर्वी पावसामुळे टोल नाक्यावरील छत उडाले होते, तर त्याआधी पूल कोसळला होता.आता वन्यप्राण्यांची ही शर्यत. यातून महामार्ग बांधणीतील त्रुटी मात्र उघड झाल्या आहेत.