नागपूर : वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र राज्यातील हजारो शिक्षकांनी दोन हजार रुपये खर्चून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेतर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी नोंदणी केली. मात्र, चार महिन्यांपासून शासनाला प्रशिक्षणाचा मुहूर्तच सापडत नसल्यामुळे शिक्षकांची निवडश्रेणी लांबली आहे.

राज्यात हजारो शिक्षक श्रेणीसुधारणेसाठी पात्र असल्यामुळे शासनाकडे प्रशिक्षण कार्यक्रमाची मागणी केली जात होती. ही मागणी मान्य झाली असली तरी प्रशिक्षण देण्यास विलंब होत असल्याने हजारो शिक्षकांची वरिष्ठ व निवडश्रेणी रखडली आहे.

मुलांच्या शिक्षणाची पातळी वाढवणे व अनुत्तीर्णाचे प्रमाण कमी करणे, या हेतूने निवडश्रेणी देण्यापूर्वी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यानुसार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेतर्फे प्रशिक्षणास पात्र शिक्षकांना २३ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन नोंदणीचे निर्देश देण्यात आले होते. यासाठी प्रती शिक्षक दोन हजार रुपये शुल्क आकारण्यात आले. काही शिक्षकांनी वरिष्ठ आणि निवड श्रेणी अशा दोन्ही प्रशिक्षणासाठी अर्ज केला आहे. मात्र, प्रशिक्षण कार्यक्रमाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. यामुळे शिक्षकांची निवडश्रेणी रखडली असून प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने केली आहे.

थोडी माहिती..

शिक्षकांना बारा वर्षांच्या सेवेनंतर वरिष्ठ आणि २४ वर्षांच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्यात येते. यामुळे शिक्षकांच्या वेतनश्रेणीत बदल घडतो. हे अधिकार संस्था चालकांना असतात. मात्र, या श्रेणीसाठी शिक्षणखात्याचे प्रशिक्षण आवश्यक असते.

वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी पात्र शिक्षकांना अद्याप ‘लॉगिन आयडी’ आणि ‘पासवर्ड’ मिळाला नाही. शासनाने त्वरित प्रशिक्षण घ्यावे व दोन्ही तारखा वेगळय़ा ठेवाव्या. – महेश गिरी, सहसचिव, महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटना.