नागपूर : डी.एड., बी.एड.ची पदवी घेऊन वर्षानुवर्षे खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये तुटपुंज्या वेतनावर शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या हजारो उमेदवारांना अखेर फेब्रुवारी महिन्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड यादीत स्थान मिळाले. यातील बहुतांश शिक्षक शाळांमध्ये सेवेत रुजूही झाले. मात्र, रयत शिक्षण संस्थेत निवड झालेल्या ६४५ उमेदवारांच्या कागदपत्रांची अद्याप पडताळणीही झालेली नाही. गुणवत्ता यादीत येऊन जर नियुक्ती रखडली असेल तर यात आमचा दोष काय? असा प्रश्न करत उमेदवारांच्या शिष्टमंडळाने शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना निवेदन देऊन तातडीने मार्ग काढण्याची मागणी केली आहे.

२०१७ नंतर तब्बल सात वर्षांनी होऊ घातलेली शिक्षक भरती अनेक अडचणींचा सामना करत फेब्रुवारी २०२४ मध्ये निवड याद्या लागून अंतिम टप्प्यात आली. ‘टीएआयटी’ परीक्षेमध्ये सर्वात जास्त गुण मिळवणारे ६४५ भावी शिक्षक रयत शिक्षण संस्थेमध्ये निवडले गेले. परंतु, निवड याद्या जाहीर होण्याअगोदरच रयत संस्थेतील शिक्षक भरतीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती आणल्याने उमेदवारांच्या पदरी निराशाच आली.

हेही वाचा…चंद्रपूर : २५ लाखांचे चोर बीटी बियाणे जप्त, कृषी विभाग व गोंडपिपरी पोलिसांची धडक कारवाई

चार महिने उलटून गेले तरीही न्यायालयीन प्रक्रिया पुढे जाण्याचे चिन्ह नाहीत. निवड झालेल्या उमेदवारांनी याआधीही आयुक्तांना दोनदा निवेदन दिले आहे. परंतु प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचे कारण देण्यात आले. त्यांच्यासोबत इतर शाळांमध्ये निवड झालेले उमेदवार सेवेत रुजू झाले असताना रयत शिक्षण संस्थेत निवड झालेले उमेदवार अद्यापही प्रतीक्षेतच आहेत.

या आहेत मागण्या

रयत शिक्षण संस्थेत निवड झालेल्या उमेदवारांना पुढील शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या आत कागदपत्रे पडताळणी व नियुक्तीसाठी आयुक्त स्तरावरून प्रयत्न करावेत. नियुक्तीसाठी आवश्यक ती कार्यवाही आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात यावी. आयुक्त कार्यालयाद्वारे नियुक्ती संदर्भात होत असलेल्या विलंबाबाबत प्रसिद्धीपत्र काढून उमेदवारांचा संभ्रम दूर करावा. सदर नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पुढील गुणवत्ता फेरी व यादी जाहीर करण्यात येऊ नये.

हेही वाचा…“शरद पवार सध्या नकारात्मक मानसिकतेत, त्यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीला..”; दुष्काळावरील टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर!

आतापर्यंत ४ हजार ४७४ उमेदवारांना नियुक्तिपत्र

शिक्षण विभागातर्फे पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत आतापर्यंत ४ हजार ४७४ उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्यात आले आहे. त्यातील ४ हजार ९३ उमेदवार प्रत्यक्ष रुजू झाले आहेत. आता उर्वरित शिक्षक भरतीसंदर्भातील प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुलाखतीशिवाय शिफारशीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ११ हजार उमेदवारांची शिफारस फेब्रुवारीमध्ये करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया थांबली होती. मात्र, शिक्षण विभागाने भरतीबाबत निवडणूक आयोगाला प्रस्ताव दिला होता. त्यानुसार आयोगाने मतदान झालेल्या जिल्ह्यांत शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया करण्यास परवानगी दिली. आता विधान परिषदेतील पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने पुन्हा नियुक्ती प्रक्रिया आणखी पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आता निवडणूक आयोगाने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यांनी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.