scorecardresearch

ऑनलाइन नोंदणीनंतरही प्रशिक्षणापासून वंचित

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेतर्फे वरिष्ठ व निवड श्रेणीच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांच्या नोंदणीला तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रशिक्षणाच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत.

ऑनलाइन नोंदणीनंतरही प्रशिक्षणापासून वंचित

हजारो पात्र शिक्षकांची वरिष्ठ व निवडश्रेणी रखडली

नागपूर : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेतर्फे वरिष्ठ व निवड श्रेणीच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांच्या नोंदणीला तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रशिक्षणाच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे श्रेणीसुधारणेसाठी पात्र शिक्षक केवळ शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे  यापासून वंचित आहेत. 

मुलांच्या शिक्षणाची पातळी वाढवणे व नापासांचे प्रमाण कमी करणे अशा विविध हेतूने निवडश्रेणी देण्यापूर्वी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेतर्फे शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणास पात्र शिक्षकांना २३ नोव्हेंबर २०२१ ते २३ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या शासकीय उपक्रमासाठी शिक्षकांना दोन हजार रुपये प्रशिक्षण शुल्क आकारण्यात आल्याने विविध संघटनांनी याचा विरोधही केला होता. वरिष्ठ आणि निवड श्रेणी अशा दोन्ही प्रशिक्षणासाठी काही शिक्षक पात्र असल्याने त्यांनी दोन्हीसाठी अर्ज केला आहे. मात्र, कुठल्याही प्रशिक्षण कार्यक्रमाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच जाहीर करावा व दोन्ही तारखा या वेगवेगळय़ा असाव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे.  

प्रशिक्षण आवश्यक का? 

१२ वर्षांची सेवा झाल्यानंतर वरिष्ठ तर २४ वर्षांची सेवा झाल्यानंतर निवडश्रेणी लागू करण्यात येते. या बदलाने शिक्षकांच्या वेतनश्रेणीत बदल घडतो. ही लागू करण्याचे अधिकार संस्था चालकांना असल्याने शिक्षकांवर चांगल्या सेवेची जबाबदारी पडते. परंतु, श्रेणी लागू करताना शिक्षणखात्याचे प्रशिक्षण आवश्यक असते. राज्यात आज हजारो शिक्षक श्रेणीसुधारणेसाठी पात्र आहेत. त्यामुळे शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रशिक्षण कार्यक्रमाची मागणी केली जात होती. अखेर ही मागणी मान्य झाली तरी प्रशिक्षण देण्यास मात्र  विलंब होत असल्याने हजारो शिक्षकांची वरिष्ठ व निवडश्रेणी रखडली आहे.

हजारो शिक्षक वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी पात्र आहेत. अद्याप त्यांना लॉगिन आयडी आणि पासवर्डही मिळालेला नाही. शासनाने त्वरित प्रशिक्षण घ्यावे व दोन्ही तारखा वेगळय़ा ठेवाव्या.

– योगश बन, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद.

अधिकाधिक शिक्षकांना प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेता यावा म्हणून नोंदणी आणि सुधारणेसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे विलंब झाला असे म्हणता येणार नाही. पुढील महिन्यापासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार आहे. 

– रमाकांत काठमोरे, सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2022 at 02:23 IST
ताज्या बातम्या