नागपूर : करोनाची लागण झाल्यानंतर फुफ्फुस आणि हृदयाने जवळजवळ काम करणे बंद केले. तब्बल एक वर्ष ते करोनामुळे आयुष्याची लढाई लढले. तत्पूर्वी त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली होती, पण त्यावेळी मुलाखतीला मुकावे लागले. आयुष्यात पुन्हा उभे राहता येईल की नाही अशी स्थिती असताना अखेर वर्षभरानंतर त्यांनी करोनाला मात दिली. अकोला येथील देवानंद तेलगोटे यांनी भारतीय वनसेवा परीक्षेत ११२वी रँक प्राप्त केली.
अकोला येथील देवानंद तेलगोटे यांचे भारतीय वनसेवेतील यश चर्चेत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर ते दिल्ली येथे मुलाखतीसाठी गेले. करोनामुळे मुलाखत पुढे ढकलण्यात आली आणि परत आल्यानंतर त्यांना करोनाची लागण झाली. अकोला येथे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण प्रकृती खालावत चालल्याने त्यांना अकोला येथून हैद्राबाद येथे ‘एअरलिफ्ट’ करण्यात आले. त्यावेळी तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) महेश भागवत यांच्या सहकार्याने ‘किम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत होती. फुफ्फुस आणि हृदयाने जवळजवळ काम करणे बंद केले. फुफ्फुस प्रत्यारोपणाची योजना होती, पण तब्बल चार महिने ‘ईसीएमओ’वर (एक्स्ट्राकॉर्पोरिअल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन) होते. त्यासाठी एका दिवसाचा खर्च एक लाख रुपये होता, पण कुटुंबियांनी आणि मित्रांनी हार मानली नाही. तब्बल एक कोटी रुपयांचा निधी त्यांनी उभारला.
देवानंद तेलगोटे यांनी हैद्राबाद येथे रुग्णालयात ‘आयसीयू’मध्ये तब्बल चार महिने काढले. त्यानंतर रुग्णालयातच बाहेर चार महिने काढले. अकोल्यात परतल्यानंतर देखील चार महिने रुग्णालयासारखीच यंत्रणा घरी उभारण्यात आली. करोनाच्या घट्ट विळख्यातून सुटका होणार की नाही, अशी स्थिती असताना त्यांनी यावर मात केली. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या हैद्राबाद आणि अकोला येथील डॉक्टरांसाठी हा चमत्कारच होता. मात्र, त्यानंतर जिद्दीने पुन्हा उभे राहात ते मुलाखतीला सामोरे गेले आणि भारतीय वनसेवा परीक्षेत त्यांनी ११२वी रँक प्राप्त केली.
आमची कौटुंबिक पार्श्वभूमी सैन्यदलाची. वडील १९८५-८६ मध्ये सैन्यदलात सहभागी झाले आणि २००७ ला सेवानिवृत्त झाले. हा वारसा भावाने पुढे चालवला आणि तो देखील सैन्यदलात भरती झाला. अलीकडेच काही महिन्यांपूर्वी सहा लेफ्टनंटचा जीव वाचवल्याबद्दल त्याला पदक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामुळे हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न मी देखील केला होता. ‘एनडीए’त प्रयत्न केले, पण यशस्वी ठरलो नाही. मात्र, कुटुंबाचा लडवय्या वारसा मला मिळाला. मृत्यूशी झालेली लढाई जिंकली. यात भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी महेश भागवत यांचे योगदान विशेष आहे.
– देवानंद तेलगोटे (भारतीय वनसेवा, ११२ रँक)
भारतीय वन सेवेत महाराष्ट्र राज्यातील यशवंतांचा टक्का वाढतो आहे. या वर्षी १४३ पैकी १८ महाराष्ट्रातील यशवंत आहेत. भारतात दुसरा आनंद खंडेलवाल आणि चौथा सिद्धार्थ पारसमल जैन हे पहिल्या पाच मध्ये आहेत. ११२ रँक मिळालेला देवानंद तेलगोटे हा अक्षरशः कोविड काळात १२० दिवस झुंज देत मृत्यूला सामोरे जाऊन परत चिकाटीने अभ्यासाला लागला. ‘व्हाट्सऍप समुहा’च्या मदतीने आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आणि मुलाखतीसाठी ऑनलाइन चर्चा करतो. – महेश मुरलीधर भागवत, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था), तेलंगणा राज्य