मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत; विद्यार्थी-पालकांशी सहमत
‘नीट’मुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून त्यातून अख्ख्या एका पिढीचे नुकसान होत आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयावर टीका करू शकत नसल्याची खंत व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी व पालकांच्या भावनांशी एकीकडे सहमती व्यक्त करीत असतानाच अप्रत्यक्षपणे न्यायालयाच्या भूमिकेशी असहमती दर्शवली आहे.
येथे आयोजित करण्यात आलेल्या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. दोनच दिवसांपूर्वी ११ मे रोजी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी न्यायालय कायदेमंडळाच्या अधिकारांवर अतिक्रमण करीत असल्याचे सांगून राज्यसभेत जीएसटी आणि वित्त विधेयकावरील चर्चेत बोलताना त्यांनी याच भावना व्यक्त केल्या. त्यापाठोपाठ आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना करिअर संधींवर माहिती देता देता ‘नीट’बाबत देशाबरोबरच राज्यात जो गोंधळ आणि पालक विद्यार्थ्यांमध्ये जो संताप उसळला आहे त्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यार्थीविरोधी भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
एमबीबीएस आणि बीडीएससाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) देशभरात एकच असावी, या न्यायालयाच्या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेतच. शिवाय, राज्य मंडळ आणि सीबीएसईच्या अभ्यासक्रमातील फरकामुळेही पालक हवालदिल आणि विद्यार्थी असुरक्षितेची भावना व्यक्त करीत आहेत.
अनेक सामाजिक संघटनांनी ‘नीट’च्या गोंधळाला राज्य शासनाला जबाबदार धरले आहे. त्यांच्या मते राज्य शासनाने न्यायालयात विद्यार्थी व पालकांची बाजू योग्यपणे मांडली नाही, त्यामुळेच संपूर्ण गोंधळाची स्थिती उद्भवली आहे.