scorecardresearch

थकीत वेतनावरून शिक्षक-अभियांत्रिकी महाविद्यालयात वाद

अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वेतनासाठी कुचंबणा होत असल्याने प्राध्यापकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाकडे वारंवार तक्रार केली होती.

प्राध्यापकांची कठोर कारवाईची मागणी, जेलभरो आंदोलनचा इशारा

नागपूर : अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वेतनासाठी कुचंबणा होत असल्याने प्राध्यापकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाकडे वारंवार तक्रार केली होती. मात्र, कुलगुरू डॉ. चौधरी यांचे अभियांत्रिकी महाविद्यालयांवर विशेष प्रेम असल्याने अशा महाविद्यालयांवर कुठलीही कारवाई न झाल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयांची मुजोरी वाढल्याचे चित्र आहे. गुरुनानक इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअिरग अँड टेक्नॉलॉजी, दहेगाव येथील महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना वर्षभरापासून वेतन मिळत नसल्याने त्यांनी आता थेट प्राचार्याची पोलिसात तक्रार करीत जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे.

गुरुनानक इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअिरग अँड टेक्नॉलॉजी येथे एक वर्षांपासून कर्मचारी व व्यवस्थापनामध्ये थकीत वेतनावरून वाद सुरू आहे. प्राध्यापक थकीत वेतनाचा हक्क मागण्यासाठी प्राचार्य हेमंत हजारे यांच्याकडे गेले असता त्यांनी अश्लील शिवीगाळ केल्याची तक्रार करण्यात आली आहे. प्राचार्य आणि संस्था मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत असल्याचा आरोपही येथील शिक्षकांनी केला आहे.   कुलगुरूसुद्धा माझे काही करू शकत नाही, अशी अरेरावीची भाषा प्राचार्यानी केल्याचा आरोप आहे. यासंदर्भातील कर्मचाऱ्यांनी कळमेश्वर ग्रामीण पोलीस ठाण्यात  प्राचार्य यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यावर  कलम ५०४/५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तक्रारकर्त्यांनी दिली. त्यामुळे संस्था व्यवस्थापनाने तात्काळ प्राचार्य डॉ. हेमंत हजारे, अप्रत्यक्ष सहभागी डॉ. सुधीर शेळके आणि उप प्राचार्य प्रा. राजेन्द्र भोंबे यांच्यावर कठोर कारवाई करावी  अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dispute teacher engineering college overdue salary ysh

ताज्या बातम्या