सट्टा किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिश्चंद्र धावडेचा नुकताच मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी क्षेत्रावर एकहाती वर्चस्व निर्माण करू पाहणाऱ्या ‘डॉन’ संतोष आंबेकरची नजर आता हरिश्चंद्र धावडेच्या कार्यक्षेत्रावर आहे. ‘डॉन’च्या महत्त्वाकांक्षेमुळे शहरात टोळीयुद्ध पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हरिश्चंद्र धावडे हा आपल्या कुटुंबासह गरोबा मैदान परिसरात रहायचा. धावडे या नावाला नागपूर शहराच्या गुन्हेगारी वर्तुळात एक वलय प्राप्त झाले आहे. बहुतांश गुंडांच्या निर्मितीमागे धावडे असल्याचे बोलले जायचे. त्यामुळे त्याच्या शब्दाला गुन्हेगारांमध्ये मान होता. नागपूरच्या गुन्हेगारी वर्तुळात टोळीयुद्ध पेटल्यानंतर दोन टोळ्यांमध्ये मांडवलीचे काम तो नेहमीच करायचा. एका पंजाबी व्यक्तीचे अपहरण आणि खंडणी प्रकरणात हरिश्चंद्र आणि त्याचा भाऊ अनिल धावडे यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यावेळी उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली होती. या घटनेनंतर धावडे बंधूंचे मोठय़ा गुन्ह्य़ांमध्ये कधीच नाव आले नाही. त्यानंतरही त्यांनीही केवळ सट्टा आणि मटका या व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले. या व्यवसायातून प्रचंड पैसा मिळत होता. या व्यवसायावर त्यांनी समाधान व्यक्त केले आणि आपला विस्तार पूर्व नागपूरच्या पलीकडे केला नाही.
हरिश्चंद्र याला चरस पिण्याचा छंद होता. त्यातून श्वसनाचा आजार जडला. यात त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत गेली. त्याच्यावर मुंबई येथे उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला नागपुरात हलविण्यात आले. उपचारादरम्यान १८ ऑगस्टला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अंत्यसंस्काराला शहरातील हजारो गुंड उपस्थित होते. यावरून त्याला मानणाऱ्यांची संख्या लक्षात येऊ शकते. हरिश्चंद्र धावडे याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबात त्याचा भाऊ नगरसेवक अनिल धावडे हा आहे. अनिलविरुद्धही अनेक गुन्हे दाखल आहेत, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये त्याचा कल गुन्हेगारी क्षेत्रापेक्षा राजकारणाकडे अधिक आहे. शिवाय हरिश्चंद्र धावडे याच्या मुलाचेही गुन्हेगारी क्षेत्रात मोठे नाव नाही. त्यामुळे हरिश्चंद्र धावडेच्या मृत्यूनंतर त्याचे कार्यक्षेत्र कोण सांभाळणार आणि वारसदारावरून गुन्हेगारी वर्तुळात ऊहापोह सुरू आहे. ही संधी साधून धावडे कुटुंबीयांना डावलून त्याच्या ताब्यातील कार्यक्षेत्र बळकावण्याचा आंबेकरचा प्रयत्न असेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डॉन’च्या मार्गातील मोठा अडथळा ‘कारागृहात’
संतोष आंबेकरचा विरोधक कुख्यात राजू भद्रे आणि त्याची टोळी सध्या कारागृहात आहे, तर उत्तर नागपुरातील कुख्यात सरदारांपैकी काही कारागृहात आहेत, काही कारागृहाबाहेर आहेत, परंतु हे सर्व आंबेकरचे मित्र आहेत, तर मोठा ताजबाग परिसरातील आबू खान आणि इतरांना आपले क्षेत्र सोडून दुसरीकडे विस्तार करायचा नाही. त्यामुळे आंबेकरला पांढराबोडी, प्रतापनगर, मनीषनगर आणि बाह्य़ नागपुरातही एकहाती वर्चस्व ठेवायचे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Don santosh ambekar eyes on gangster harishchandra dhawade matka business
First published on: 30-08-2016 at 06:07 IST