अमरावती : काल-परवा गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील रॅलिज प्लॉट परिसरातील एका घराच्या छतावर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकून दहा जणांना अटक केली आणि एमडी (मेफेड्रॉन), गांजा आणि विदेशी मद्य जप्त केले. बुधवारी नागपुरी गेट पोलिसांनी एका तस्कराला अटक केली. त्याच्याकडून ३ लाख रुपये किमतीचे एमडी जप्त करण्यात आले. शहरात अमली पदार्थांची तस्करी वाढल्याचे चित्र या कारवाईच्या निमित्ताने उघड झाले आहे.
अमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरूणांकडून मेफेड्रॉनला सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय गांजा, चरस, कोकेन अशा अमली पदार्थांचीही धडाक्यात विक्री केली जाते. मेफेड्रॉन निर्मिती आणि तस्करीने देशभरातील तपास यंत्रणांसमोर आव्हान उभे केले आहे. नागपुरी गेट पोलिसांनी सईद खान शरीफ खान (४५, रा. पाटीपुरा) या अमली पदार्थ तस्कराला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६०.५१ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले, त्याची किंमत सुमारे ३ लाख २ हजार रुपये आहे.
रॅलिज प्लॉट परिसारात प्रमेंद्र ओमप्रकाश शर्मा हा त्याच्या घराच्या छतावर काफिला नावाने हुक्कापार्लर काही दिवसांपासून चालवीत होता. मध्यरात्री उशिरापर्यंत या पार्लरवर युवकांची होत असलेली गर्दी परिसरातील व्यापाऱ्यांसह काही रहिवाशांकरिता डोकेदुखी ठरत होती. त्यासंदर्भातील तक्रारी वाढल्यानंतर गुन्हे शाखा युनीट दोनच्या पथकाने काफिला नावाने सुरू असलेल्या अवैध हुक्कापार्लरवर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकली. घटनास्थळावर पाहणी केली असता राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूजन्य पदार्थाचे हुक्क्याचे विविध फ्लेवर उपयोग करून हुक्कापार्लर सुरू होते. एका टिनाच्या शेडमध्ये काही जण हुक्क्याचे सेवन करताना दिसले. येथून हुक्का स्पॉट, सुगंधित फ्लेवरचे डबे, हुक्का पिण्याच्या उपयोगात येणाऱ्या नळ्या, एमडी आणि गांजा मिळून आला.
जनजागृतीची मोहीम
शहर पोलीस आयुक्तालयाने ‘ऑपरेशन वाईप ऑउट’ ही मोहीम हाती घेतली असून १७ ऑगस्टपर्यंत जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दरम्यान, गत आठ महिन्यांत शहरात सात ठिकाणी कारवाई करण्यात आली. या प्रकरणांत १०५ आरोपींना अटक झाली असून, सुमारे ९२ लाख रुपयांहून अधिक अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
एखादी व्यक्ती अमली पदार्थांचे सेवन करीत असेल किंवा खरेदी-विक्री करीत असेल तर हेल्पलाइन क्रमांकावर माहिती नागरिकांनी द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल. तसेच त्यांना योग्य ते बक्षीस दिले जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.