महसूल सप्ताहात शासनाची नवी उद्घोषणा
महिला सक्षमीकरणासाठी राज्याचे नवीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवीन उद्घोषणा केली आहे. ‘आई, बाई, अक्का.. आता जग जिंका’ अशी ही उद्घोषणा असून कुटुंबाच्या संपत्ती पत्रकावर घरच्या ‘लक्ष्मी’चेही नाव असावे यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार
आहे.
यंदाही १ ते ७ ऑगस्टदरम्यान राज्यात सर्वत्र महसूल सप्ताह पाळण्यात येणार आहे, त्यानिमित्त महाराजस्व अभियान राबविण्यात येणार असून या अंतर्गत महिला सक्षमीकरणासह कुटुंबाच्या संपत्तीवर पुरुषांबरोबर महिलांच्या नावाची नोंद करणे, वारसा नोंद करताना महिला वारसदारांची नावे नोंद करणे, महिला खातेदारांच्या वहिवाट किंवा पांधण रस्त्यांच्या संदर्भातील तक्रारींचा निपटारा करणे, महिला बचत गटांना कर्ज पुरवठा करणे, रोजगार हमी योजनेतील महिला जॉबकार्ड धारकांना मार्गदर्शन करणे, शिधापत्रिकेवर कुटुंब प्रमुख म्हणून महिलांच्या नावांची नोंद करणे, मतदार यादीत १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींची नावे नोंदविणे, वन जमिनीचे पट्टे वाटप,उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचे वाटप, महिलांसाठी आरोग्य तपासणी, महिलांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्रे देणे, ग्रामपंचातयीतील नमुना ८ मध्ये पतीच्या नावासोबत महिलांच्या नावांची नोंद करणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलेला ऑटोरिक्षा परवाना देणे, शिलाई मशीनचे वाटप करणे आदींचा समावेश आहे, असे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शासनाने यंदा महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे. या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले. संपत्तीच्या कागदपत्रांवर महिलांच्या नावाची नोंद आणि उज्ज्वला योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. महसूल सप्ताहात या योजनांची सुरुवात होणार असली तरी त्या वर्षभर राबविण्यात येणार असल्याचे अनुपकुमार यांनी स्पष्ट केले.
प्रकाश पाटील उत्कृष्ट उपविभागीय अधिकारी
महसूल दिनानिमित्त १ ऑगस्टला विभागातील १३ उत्कृष्ट कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्य़ाचे उपविभागीय अधिकारी व प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांना पुनर्वसनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुरस्कृत केले जाणार आहे. राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात होणार आहे. इतर सत्कारमूर्तीमध्ये आर.ए. देठे (मंडळ अधिकारी, हिंगणा), नेत्रदीप डोये (कोतवाल, तहसील नागपूर), अक्षय पोयाम (नायब तहसीलदार, िहंगणा), एस.एस. गिरी (निम्नश्रेणी लघुलेखक, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर), विकास सावरकर ( तलाठी-ग्रामीण तहसील), बळवंत वानखेडे (कोतवाल, तहसील, हिंगणा) आदींचा समावेश आहे.