अनेक ठिकाणी बॅरिकेटिंग, काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक

छत्रपती उड्डाणपूल पाडण्यास सुरुवात झाली असून या मार्गाची वाहतूक विविध रस्त्यांनी वळविण्यात आली आहे. लोकांना मनस्ताप होऊ नये म्हणून प्रत्येक वळणावर दोन पोलीस शिपाई नेमण्यात आले आहे. मुख्य वळणावर वाहतूक पोलीस निरीक्षक कार्यरत आहेत.

वध्रेकडून नागपूरकरडे येणारी वाहतूक कोकाकोला फॅक्टरी चौकातून डावीकडे खामला बाजार चौकातून खामला चौक, सावरकरनगर चौक, देवनगर चौक, पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि नीरी मार्गाने वळविण्यात आली आहे. वध्रेकडून हिंगणा एमआयडीसीकडे जाणारी वाहतूक सावरकरनगर मार्गाने वळविण्यात आली आहे. शहरातून वध्रेकडे जाणारी वाहतूक हिंदुस्थान कॉलनीतून डावीकडे गजानननगर, नरेंद्रनगर, नरेंद्रनगर उड्डाणपूल आणि कोकाकोला चौक परिसरातून वळविण्यात आली आहे. कोकाकोल फॅक्टरी चौक, खामला चौक, सावरकरनगर चौक, अजनी नाका हे मार्ग ‘नो पार्किंग झोन’ करण्यात आले आहेत. तर हिंदुस्थान कॉलनी आणि गजानननगर टी-पॉईंट ते नरेंद्रनगर उड्डाणपूल या मार्गावरही ‘नो पार्किंग झोन’ करण्यात आले आहे. हिंदुस्तान कॉलनी ते गजानननगर परिसरापर्यंतच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. याशिवाय हिंदुस्तान कॉलनी आणि खामला परिसर ‘नो पार्किंग झोन’ जाहीर करण्यात आले आहे.

या संदर्भात वाहतूक पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्रत्येक वळणावर दोन शिपाई तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय मुख्य चौकांमध्ये वरिष्ठ अधिकारी असून आजचा पहिला दिवस असल्याने काही ठिकाणी अनेकांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु खासगी बस सेवा आणि इतर बसेसकरिता नरेंद्रनगर पूल परिसरात एक जागा सपाट करून त्या ठिकाणी थांबा करण्यात आला आहे. मेट्रो रेल्वे प्रशासनाला सांगून लोकांना मार्ग दाखविण्यासाठी स्वयंसेवक नेमण्यास सांगण्यात आले आहेत. तसेच छत्रपती पूल पाडताना कोणालाही इजा होऊ नये म्हणून संपूर्ण परिसराला बॅरिकेटिंग करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच जनआक्रोश आणि इतर स्वयंसेवी संस्थांची बैठक घेऊन लोकांमध्ये वळविण्यात आलेल्या जनजागृती करण्याची विनंती केली असल्याचे त्या म्हणाल्या.