विविध भागातील तलावांवर विसर्जनाची व्यवस्था  ; शहरात ९३ कृत्रिम तलाव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहा दिवस भक्तिरसात न्हाऊन निघाल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. गुरुवारी अनंत चतुर्दशीला विदर्भातील विविध भागातील घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन तलावात होऊ नये, असे न्यायालयाचे आदेश असल्यामुळे महापालिकेने शहरातील विविध भागातील तलावांजवळ आणि प्रभागांमध्ये एकूण ९३ कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. शिवाय १० विसर्जनस्थळी वेगळे तलाव तयार करण्यात आले आहेत.

सोमवारी रात्री शहरात आणि जिल्ह्य़ात काही भागात पाऊस सुरू झाल्यानंतर असेच वातावरण पुढचे दोन दिवस राहिले तर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती मिरवणुकांच्या उत्साहावर विरजन पडण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या वतीने विसर्जनासाठी शहरातील विविध तलावांवर व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकांसाठी मंडळांचे कार्यकर्ते तयारीला लागले असून महापालिका, पोलीस दल व पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संघटना विसर्जनाच्या कामासाठी सज्ज झाल्या आहेत.

मिरवणुकीसाठी डीजे, ढोल, लेझीम पथके, ध्वजपथके, बँडपथक सज्ज आहेत. शहरात फुटाळा तलाव, गांधीसागर, नाईक तलाव, सोनेगाव तलाव, सक्करदरा, अंबाझरी, खदान तलाव, गोरेवाडा ओव्हर फ्लो, कोराडी तलाव तसेच संजय गांधीनगर या ठिकाणी कृत्रिम तलाव करण्यात आले आहेत. मोठय़ा मूर्ती फुटाळा व सोनेगाव तलावातच विसर्जित केल्या जातील. प्रत्येक ठिकाणी निरीक्षण मनोरे, पोहण्यात तरबेज शिपाई, विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे.

यंदा शहरात ११०० च्यावर लहान-मोठय़ा गणेशमूर्तीची स्थापना शहरात करण्यात आली असून काही ठिकाणी आकर्षक देखावे आणि रोषणाई करण्यात आली आहे.

सार्वजनिक गणेश मंडळांना गणपती विसर्जनाचे वेध लागले असून त्यांनी तयारी सुरू केली आहे. गुरुवारी सकाळपासून शहरातील विविध भागातील तलावांवर गणेश विसर्जन होणार असल्यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी तयारी करण्यात आली. तलावांच्या काठापर्यंत कोणी जाऊ नये याची काळजी घेत त्या ठिकाणी कठडे लावण्यात आले आहेत. कठडे ओलाडून कोणालाही जाता येणार नाही.

अनंत चतुर्दशी गुरुवारी दुपापर्यंत आहे त्यामुळे घरगुती गणपतींचे विसर्जन दुपारच्यावेळी होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती मूर्तींचे विसर्जन सायंकाळी होईल. शहरातील विविध जलाशयांवर गणेश विसर्जनासाठी गर्दी वाढणार असल्यामुळे पोलीस, महापालिका आणि काही स्वयंसेवी संघटना तलाव परिसरात मदतीसाठी राहणार

आहेत. रेशीमबागेमधील नागपूरचा राजा, आणि एचबी टाऊनमधील विदर्भाचा राजा, पाताळेश्वर परिसरातील महालचा राजा, दक्षिणामूर्ती गणेश मंडळ, भेंडे लेआाऊट, धरमपेठ, गोकुळपेठ या भागातील गणेश मंडळांच्या मिरवणूक गुरुवारी सकाळी निघणार आहे.

गणेशोत्सवाचे आगमन, विसर्जन असो की कुठलीही मिरवणूक, ढोल-ताशांच्या आवाजाच्या तालावर धुंद होऊन नाचणारे गणेश मंडळांचे कार्यकर्ते.. असे चित्र दरवर्षीच बघायला मिळत असते. गेल्या पाच-सहा वर्षांत डीजेचे प्रमाण वाढले असले तरी ढोल-ताशांना मात्र आजही पूर्वी इतकीच मागणी आहे. शहरातील विविध भागात ढोल पथक तयार झाले आहे. २० ते २५ युवक युवती असलेले पथक शहरातील विविध भागात कार्यक्रम करीत आहे. आज त्यांची मागणी वाढली आहे. ढोल (संदल), पथकासह लेझीमपथके, ध्वजपथके, बँडपथकांची मागणी वाढली आहे.

शहरातील सर्व तलावांच्या ठिकाणी निसर्गप्रेमी संस्थांचे प्रतिनिधी निर्माल्य जमा करण्यासाठी उभे राहणार असून तलावात कुणीही हार व फुले टाकू नये, असे आवाहन वनराई, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब, निसर्ग विज्ञान, नागूपर महापालिका, राष्ट्रीय हरित सेना, राष्ट्रीय सेवा योजना, ग्राहक मार्गदर्शक केंद्र, हस्तशिल्पी बहु सेवा सह संस्था, लोटस कल्चरल अ‍ॅन्ड असोसिएशन, विद्या भारती आदी विविध निसर्गप्रेमी संस्थांनी केले आहे. दहा झोनमध्ये महापालिकेच्यावतीने निर्माल्य संकलन रथ राहणार आहेत. हा रथ तलावाजवळ आणि प्रत्येक गणेश मंडळाजवळ जाणार असून नागरिकांनी त्यात निर्माल्य टाकावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. घरगुती गणपती असलेल्यांनी नागरिकांनी घरीच खड्डा करून निर्माल्यापासून सेंद्रीय खत निर्माण करावे आणि परिसरात लावलेल्या झाडांना द्यावे, असे आवाहन निसर्ग विज्ञान संस्थेने केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eco friendly ganesh idol immersion in nagpur
First published on: 14-09-2016 at 01:13 IST