महानुभाव पंथाचा अभ्यास होणार

नागपूर :  महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या वतीने रिद्धपूर, अमरावती येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा तथा तत्त्वज्ञान अध्ययन केंद्र उघडण्यात येणार आहे. याविषयीची स्वीकृती भारत सरकारकडून मिळाली असून या शैक्षणिक वर्षांपासून पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास सुरुवात होणार असल्याची माहिती विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री चक्रधर स्वामी यांचे हे आठवे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांची कर्मभूमी रिद्धपूर, अमरावती होती. तेथे राहून त्यांनी मराठी भाषेत भारतीय तत्त्वज्ञान, भगवद्गीता, सनातन धर्म, चिकित्सा यांसह अनेक विषयांवर आधारित विपूल ग्रंथांची रचना केली. त्या विपूल ज्ञानसंपदेचे सर्व भारतीय भाषांमध्ये भाषांतर करणे तथा त्यावर अध्ययन व अनुशीलन यांची व्यवस्था करण्याचे काम रिद्धपूर येथील नवीन शैक्षणिक केंद्रातून होणार आहे. हे केंद्र बळकट करण्यासाठी भारत सरकारने भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, भारतीय भाषा संस्थान, मैसूर आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास, नवी दिल्ली यांना वेगवेगळ्या भूमिका सोपवण्यात आल्याची माहिती प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांनी दिली.

पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन अभ्यासक्रम

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या रिद्धपूर येथील शैक्षणिक परिसरात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून प्रवेशाला सुरुवात होणार आहे. येथे कला विषयात पदवी, पदव्युत्तर आणि संशोधनविषयक अभ्यासक्रम सुरू होणार असून प्रायोगिक तत्त्वावर यंदा केवळ पदवी अभ्यासक्रम सुरू होईल. सर्व अभ्यासक्रम पारंपरिक असले तरी श्री चक्रधर स्वामी आणि महानुभाव पंथाविषयीचा अभ्यासक्रमात समावेश राहणार आहे.