विदर्भातील कापूस उत्पादकांसाठी दिलासा

नागपूर : विदर्भातील प्रमुख रोख पीक म्हणून ओळखला जाणारा कापूस आणि पूर्व विदर्भातील धान पिकांना दरवर्षी त्यावर पडणाऱ्या अनुक्रमे बोंडअळी आणि खोड किडय़ांमुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. ते टाळण्यासाठी ‘ट्रायकोग्रामा’ या परोपजीवी कीटकांपासून अळ्या व खोडकिडय़ांची अंडीच नष्ट करण्याचा प्रयोग परिणामकारक ठरू लागला आहे.

हा कीटक अंडीवर्गीय कीटकांची अंडी नष्ट करतो. त्याला शेतात सोडल्यावर शेतात फिरून बोंडअळ्याचे अंडे शोधून काढून ते नष्ट करतो व तेथे स्वत:ची अंडी टाकतो. यामुळे  बोंडअळी किंवा तत्सम किडय़ांची नवीन अवस्था तयार होत नाही, परिणामी त्याला मारण्यासाठी फवारणी करण्याचा प्रश्नच येत नाही असे या प्रयोगाचे प्रशिक्षण देणारे केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन विभागाचे तांत्रिक अधिकारी प्रल्हाद कोल्हे यांनी सांगितले.

नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नागपूर जिल्ह्य़ात हा प्रयोग प्रभावीपणे करण्यासाठी पुढाकार घेतला असून यासंदर्भात जि.प. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जात आहे. ते गाव पातळीवर लोकांना याबाबत माहिती देणार आहे.

विदर्भात कापूस व पूर्व विदर्भात धान ही प्रमुख पिके आहेत. गुलाबी बोंडअळीमुळे कापसाचे तर खोडकिडय़ांमुळे धानाच्या उत्पादनावर परिणाम होतो. दरवर्षी लाखो रुपये कीटकनाशक फवारणीवर खर्च करूनही उपयोग होत नाही. शिवाय भाजीपाला आणि तत्सम पिकांची ही अवस्था आहे. ‘ट्रायकोग्रामा’ हा अशा कीटक व अळ्यांना नष्ट करण्यासाठी  प्रभावी ठरतो. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे हे ‘वनामती’ मध्ये असताना त्यांनी अशाप्रकारचे प्रयोग केले होते.

अमरावतीत असतानाही त्यांनी हा उपक्रम राबवला. त्याचा याला फायदा शेतकऱ्यांना झाला होता. त्याची माहिती लोकांपर्यंत पोहचली नसल्याने अजूनही तो अनेकांना माहिती नाही. त्यामुळे त्याची नागपूर जिल्ह्य़ात यंदा प्रभावी अंमलबजावणी करण्याचे ठाकरे यांनी ठरवले आहे.

ते म्हणाले, धानावरील खोडकिडा आणि कापसावर पडणाऱ्या बोंडअळीचा नायनाट करण्यासाठी  हा प्रयोग दोनशे टक्के परिणामकारक आहे. विशेष म्हणजे शेतकरी त्याच्या पातळीवर तो करू शकतो.

हा प्रयोग शेतकरी हिताचा आहे. कापसावर पडणारी बोंडअळी आणि धानावर पडणारा खोडकिडा यामुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. त्यावर हा प्रयोग परिणामकारक आहे. नागपूर जिल्ह्य़ात तो प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न आहे.

– रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी, नागपूर

कीटकनाशक फवारणीमुळे किडे व अळ्या मरत असल्या तरी ‘ट्रायकोग्रामा’मुळे अळ्या व कीटक अंडीअवस्थेत असतानाच नष्ट होतात. त्यामुळे पुढची अवस्थाच तयार होत नाही, यामुळे फवारणीचा खर्च वाचतो.

– प्रल्हाद कोल्हे तांत्रिक अधिकारी, केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन