scorecardresearch

स्मृती मंदिरात शिंदे गटाचे आमदार आज जाणार का?

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असताना भाजपच्या सदस्यांबरोबर शिंदे गटाचेही आमदार जाणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

स्मृती मंदिरात शिंदे गटाचे आमदार आज जाणार का?
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांचे बौद्धिक

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाजपचे विधानसभा व विधान परिषदेचे सदस्य मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्मृती मंदिर येथे जाणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना बौद्धिक दिले जाणार आहे. मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असताना भाजपच्या सदस्यांबरोबर शिंदे गटाचेही आमदार जाणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून नागपूरच्या हिवाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह पक्षाचे सर्व मंत्री, सदस्य आणि राज्यातील प्रमुख पदाधिकारी स्मृती मंदिरात दर्शनासाठी जातात. दोन वर्षे करोनामुळे अधिवेशन न झाल्यामुळे यावेळी राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर आता स्मृती परिसरात दर्शनासाठी जाणार आहेत. त्यासाठी भाजपच्या सर्वच सदस्यांनी उद्या सकाळी ७ वाजेपर्यंत रेशीमबागेतील स्मृती परिसरात उपस्थित राहावे, असे आदेश पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार आशीष शेलार यांनी काढले आहे. रेशीमबागेत स्मृती मंदिर परिसरात न गेलेल्या सदस्यांना यापूर्वी पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली होती. तेव्हापासून शक्यतो सर्वच सदस्य संघाच्या या भेटीला अनुपस्थित राहण्याचे टाळतात.

भाजपने यासंदर्भात आदेश काढले असले तरी शिंदे गटाकडून मात्र कुठलेही आदेश काढण्यात आले नसल्याची माहिती शिंदे गटाच्या एका आमदाराने दिली. उद्या सकाळी स्मृती मंदिर परिसरात आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे सर्वच आमदार दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सर्व मंत्री व आमदारांचा परिचय होणार असून त्यानंतर संघाचे क्षेत्रीय पदाधिकारी बौद्धिक देऊन संघाच्यावतीने चालणाऱ्या विविध सेवा उपक्रमांची माहिती देतील.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-12-2022 at 00:56 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या