ऊर्जा दक्षता सेवा कंपनीशी करार; ई-वाहनांची सोय होणार
हरित संकल्पेवर आधारित महामेट्रोने आता पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने पाऊल टाकत प्रत्येक स्थानकावर ‘बॅटरी चार्जिग’ सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने ऊर्जा दक्षता सेवा लिमिटेड (एनर्जी एफिसियन्सी सव्हीसेस लि.) या कंपनी सोबत सामंजस्य करार केला आहे.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई-मोबिलीटी कार्यक्रमांतर्गत ई-वाहन आणि सार्वजनिक चार्जिग सुविधा सर्वत्र उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्या अनुषंगाने कंपनीने हा करार केला. त्यानुसार महामेट्रोकडून त्यांच्या स्थानकावर ऊर्जा दक्षता विभागाला चार्जिग उपकरण व विद्युत व्यवस्था उभारणीसाठी जागा देण्यात येईल त्याबदल्यात कंपनी महामेट्रोला शुल्क देईल. आज गुरुवारी झालेल्या करारावर महामेट्रोचे कार्यकारी संचालक आनंद कुमार आणि ऊर्जा दक्षता सेवा लिमिटेडचे (पूर्व महाराष्ट्र) प्रादेशिक प्रमुख किशोर चव्हाण यांनी हस्ताक्षर केले. यावेळी महामेट्रोचे संचालक(रोलिंग स्टॉक) सुनील माथुर, संचालक(प्रकल्प) महेश कुमार, संचालक(वित्त) उपस्थित होते. महामेट्रोने त्यांच्या स्थानकावर आतापर्यंत ९६५ सोलर पॅनल लावले असून यातून मेट्रोसाठी लागणाऱ्या एकूण विजेपैकी ६५ टक्के वीज अपेक्षित आहे. मेट्रो टप्प्याटप्प्याने सर्व स्थानकावर सौर पॅनल लावणार असून त्यानंतर स्थानकावर चार्जिग पॉईंटची सोय होईल. आतापर्यंत दिल्ली आणि चेन्नई येथे ही सेवा उपलब्ध होती. आता त्यात नागपूरचा समावेश होणार आहे. विशेष म्हणजे, ई-वाहनांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी चार्जिग पॉंईंट सोयीचे ठरतील व त्यामुळे प्रवाशी संख्या वाढेल, असा विश्वास महामेट्रोने व्यक्त केला आहे. चार्जिग पॉंईंटवर लिथियमनिर्मित बॅटरी चार्ज केली जाईल. एका चारचाकी वाहनाला पूर्णपणे चार्ज व्हायला १ तास लागतो. त्यावर १२० कि.मी. पर्यंत वाहन चालू शकते हे येथे उल्लेखनीय.