• खुर्ची फेकली, पोलिसांना धक्का देऊन आंदोलकांची निदर्शने
  • वीज दरवाढ मागे घेण्यासह ‘एसएनडीएल’ला हद्दपार करण्याची मागणी
  • काँग्रेससह इतर संघटनांची निदर्शने

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज दरवाढीवर बुधवारी घेतलेल्या सुनावणीत काँग्रेस, प्रहार, विदर्भवादी विद्यार्थी संघटनांसह इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सुनावणीस्थळी पोहचून जोरदार निदर्शने केली. पोलिसांनी इमारतीच्या खाली काँग्रेसच्या आंदोलकांना रोखले असता त्यांनी धक्का देऊन थेट सभास्थळ गाठले. याप्रसंगी दाराच्या बाहेरील खुर्ची फेकत एसएनडीएलचा करार रद्द करण्यासह दरवाढीला विरोध करत सुनावणीच रद्द करण्याचे नारे दिले. शेवटी काँग्रेससह इतर संघटनांकडून आयोगाला निवेदन सादर केल्यावर वातावरण शांत झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, अ‍ॅड. अभिजित वंजारी यांच्यासह पक्षाचे बरेच मान्यवर सहभागी झाले होते. आंदोलकांनी सकाळी सुनावणी सुरू झाल्यानंतर अध्र्या तासांनी अचानक वनामतीच्या बाहेर जोरदार निदर्शने सुरू केली. पोलिसांनी आंदोलकांना वनामतीच्या आत प्रवेशापासून रोखल्याने आंदोलक संतप्त झाले. त्यांनी सुनावणी ही नागरिकांचे म्हणणे ऐकण्याकरिता असून पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणावर येथे बंदोबस्त वाढवून लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव आल्यावर सुनावणी घेतली जाते. परंतु शेवटी आयोगाकडून आधीच ठरलेला निर्णय घेतला जात असल्याचा आरोप विकास ठाकरे यांनी याप्रसंगी केला.

नागपूरला वीज वितरण करणाऱ्या ‘एसएनडीएल’कडून वीज ग्राहकांची वेगवेगळ्या पद्धतीने लूट सुरू असून या कंपनीचा करार रद्द करण्याची मागणी याप्रसंगी लावून धरण्यात आली. काँग्रेसकडून येथे ‘महाग पाणी, महाग तेल, टॅक्स नंतर, वीज फेल’, ‘वीज दरवाढ, जनता बेहाल, कुठे गेली, महाराष्ट्र सरकार’, ‘महाराष्ट्र सरकार की यही कहानी, महंगी होकर रहेगी बिजली, पाणी’ असे नारे देण्यात आले. पोलिसांकडून आत प्रवेश दिला जात नसल्याचे बघत संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्का देत वनामतीच्या आत सुनावणी सुरू असलेल्या सभागृहाच्या बाहेर धाव घेतली.

अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याचे बघून त्वरित सभागृहाच्या कडीला बाहेरून आधीच कुलूप लावण्यात आले. सभागृहाचे द्वार बंद असल्याने आंदोलकांना आत शिरता आले नाही. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी सुमारे अर्धा ते एक तास जोरदार निदर्शने केली. निदर्शने सुरू असतानाही आयोगाकडून सभागृहात कुलूपबंद अवस्थेत सुनावणी सुरू होती. आंदोलकांचा रोष बघून घटनास्थळी शीघ्र कृती दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आंदोलकांना बाहेर काढून काँग्रेसच्या निवडक शिष्टमंडळाकडून आयोगाला निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर लगेच सुनावणीस्थळी प्रहार संघटनेचे राज्याच्या वेगवेगळ्या भागातील आंदोलक पोहोचले.

त्यांनीही वीज दरवाढीच्या विषयावर जोरदार निदर्शने केली. प्रहारचे देवेंद्र गोडबोरे यांनी आत जाऊन आयोगापुढे वीज दरवाढीला विरोध दर्शवून आपले मत मांडले व निवेदन सादर केले. आंदोलनात काँग्रेसचे प्रशांत धवड, सरस्वती सलामे, उज्ज्वला बनकर, प्रेरणा कापसे, सुजाता कोंबाडे, रेखा बारहाते, राजश्री पन्नासे, देवा उसरे, शीला मोहोड, दीपक वानखेडे, मुन्ना वर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते, तर प्रहारकडून गज्जू कुबडे, देवा धोटेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनात काँग्रेसकडून एसएनडीएलवर जास्त तर वीज दरवाढीवर कमी जोर दिल्याची जोरदार चर्चा उपस्थितांमध्ये होती.

आंदोलनाच्या दरम्यान प्रवेशावर र्निबध

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची नागपूरच्या वनामतीमध्ये सुनावणी सुरू असताना अचानक काँग्रेस, प्रहारसह इतर संघटनांकडून दरवाढीला विरोध करीत आंदोलन सुरू झाले. अनुचित प्रकार शक्य असल्याचे बघून तातडीने सुनावणीस्थळी प्रवेशावर र्निबध घालण्यात आले. त्यामुळे सुनावणीकरिता नाव नोंदवलेल्यांसह काही पत्रकारही काही काळ बाहेरच अडकले, परंतु वातावरण शांत झाल्यावर काही कालावधीनंतर त्यांना आत प्रवेश देण्यात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity bill increase issue in nagpur
First published on: 14-07-2016 at 01:19 IST