पर्यटकांचा भार सोसवेनासा झाल्याने रजा मंजूर
नागपूर : पर्यटकांना वाघ दिसावा म्हणून त्यांची मदत घेतली जाते. त्यांच्या अंगावर बसून व्याघ्रप्रकल्पात सफारी केली जाते, पण पर्यटकांचा भार त्यांनाही आता सोसवेनासा होतो. म्हणून मग त्यांच्यासाठी हिवाळ्यात रजेची तरतूद केली जाते. मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील चार हत्तींना नुकतीच १५ दिवसांची रजा मंजूर करण्यात आली असून या कालावधीत विविध आयुर्वेदिक उपचाराचा वापर करुन त्यांची काळजी घेतली जाणार आहे.
लक्ष्मी, जयश्री, चंपाकली आणि सुंदरमाला असे चार हत्ती मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागाअंतर्गत कोलकास संकूल येथून सफारीसाठी वापरले जातात. मात्र, येत्या १० ते २४ जानेवारीदरम्यान १५ दिवस त्यांना आरामासाठी रजा दिली जात आहे. एरवी वर्षभर हे चारही हत्ती सफारीसाठी पर्यटकांच्या सेवेत असतात. त्यामुळे त्यांनाही मालिशची गरज असते. विशेषकरुन त्यांच्या पायांवर आयुर्वेदिक उपचार केले जातात. यात हिरडा, बिबा, ओवाफुल, गुगळी, तुरटी, सागरगोटी, आंबेहळद यासारख्या जडीबुटीचे मिश्रण चुलीवर तयार करुन त्याचा शेक हत्तीच्या पायांना दिला जातो. या १५ दिवसात त्यांना इतर कोणत्याही कामांसाठी वापरले जात नाही.