पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा तडकाफडकी चलनातून बाद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये उद्या, गुरुवारपासून ग्राहकांच्या रांगा लागणार आहेत. बँकांसाठीही ही आपत्कालीन परिस्थिती माणून त्याला तोंड देण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. तशा सूचनाही सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात आल्या आहेत.
मंगळवारी मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. नागरिकांना या नोटा बदलून घेण्यासाठी पन्नास दिवसांची मुदत देण्यात आली. या काळात या नोटा बँका आणि टपाल कार्यालयातून बदलवून घ्यायच्या आहेत किंवा बँकेत तरी जमा करायच्या आहेत. यासाठी मंगळवारी रात्रीपासूनच बँकांची तयारी सुरू झाली आहे. ही यंत्रणा कशी राबवायची यासंदर्भात प्रत्येक बँकांना मार्गदर्शक सूचना रिझव्र्ह बँकेकडून देण्यात आल्या आहेत. बँकांत एकाच वेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन बनावट नोटा येण्याचा धोका लक्षात घेऊन त्या न स्वीकारण्याबाबत व त्याची ओळख पटवून घेण्याबाबत कर्मचाऱ्यांनी अधिक दक्षतेने काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी बुधवारी बँकांचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. या काळात कर्मचाऱ्यांना गुरुवारी होणाऱ्या गर्दीला तोंड देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या यंत्रणेची माहिती देण्यात आली. १०० रुपयांच्या नोटांचीही पुरेशी तजवीज प्रत्येक बँकांनी त्यांच्या शाखेत करून ठेवली आहे. कर्मचाऱ्यांनी या काळात जास्तीत जास्त कार्यक्षमता दाखवून या स्थितीला समोरे जावे, असे आवाहन करणारे पत्रही बँकांना पाठविण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी सर्व बँकांकडे रिझव्र्ह बँकेने नोटा बदलवून देण्यासंदर्भातील अर्जाचा नमुनाही पाठविला आहे, ग्राहकांना तो भरून द्यायचा आहे. त्यात ग्राहकांना त्यांचे नाव, ओळख दर्शविणारा पुरावा (पॅन कार्ड, आधार क्रमांक, निवडणूक ओळखपत्र किंवा तत्सम), बदलवून द्यायच्या नोटांचा तपशील याची माहिती भरून द्यावी लागणार आहे.
दरम्यान, बँक आणि टपाल कार्यालयात जुन्या नोटा स्वीकारणे आणि त्याबदल्यात नवीन नोटा देण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. ग्राहकांना जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. १० ते २४ नोव्हेंबर तसेच २५ ते ३० डिसेंबर या दरम्यान या नोटा जमा करता येईल. मात्र पैसे काढायचे असेल तर त्यासाठी प्रत्येकी चार हजार रुपयांची मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. १० नोव्हेंबरपासून नवीन नोटा बँकेतून मिळणे सुरू होईल. बँकेतून एकावेळी दहा हजार आणि आठवडय़ाला वीस हजार, तर १० नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या दरम्यान एटीएममधून दिवसाला २ ते ४ हजार रुपये एकावेळी काढता येणार आहे.