नक्षलवाद्यांचा विरोधामुळे परिसरात दहशत

सुमित पाकलावर, लोकसत्ता

गडचिरोली : बहुचर्चित सूरजागड लोहखाणीतील वाढीव उत्खननाला केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने अनेक अटींसह मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या या खाणीतून वर्षाकाठी ३० लाख टन इतक्या लोहखनिज उत्खननाला परवानगी होती. आता ती वाढून १ कोटी टन इतकी होणार आहे. विशेष म्हणजे याविरोधात उच्च न्यायालयात याचिका देखील प्रलंबित आहे.

हेही वाचा >>> मेट्रोप्रमाणे रेल्वेही उन्नत मार्गाचा पर्याय शोधतेय! इतवारी-नागभीड, वडसा-गडचिरोली उन्नत रेल्वेमार्ग

स्थानिक आदिवासी आणि नक्षल्यांच्या प्रखर विरोधानंतर एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवर वर्षभरापूर्वी लोहखनिज उत्खनन चालू झाले. लॉयड मेटल्स कंपनीकडे याचे कंत्राट आहे. तर त्रिवेणी अर्थमुवर्स ही कंपनी भागीदार म्हणून काम पाहत आहे. सुरवातीला टेकडीवरील ३४८ हेक्टर वनजमीन खाणीकरिता देण्यात आली आहे. यातून सद्य:स्थितीत ३० लाख टन खनिज उत्खनन करण्यास परवानगी होती. मात्र, कंपनीला ही मर्यादा वाढवून १ कोटी टन इतकी पाहिजे असल्याने तसा प्रस्ताव त्यांनी शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी जनसुनावणी घेण्यात आली. परंतु या जनसुनावणीत माध्यमांसह अनेकांना प्रवेश नाकारण्यात आल्याने प्रभावित क्षेत्रातील नागरिकांनी यावर आक्षेप नोंदवला होता. वाढीव उत्खननास परवानगी मिळाल्यास आसपासच्या गावांवर प्रदूषणाचे संकट ओढवेल अशी भीती येथील आदिवासींमध्ये आहे. त्यानुसार पर्यावरण विभागाने परवानगी देताना कंपनीवर अनेक अटी लादल्या आहेत. अशी प्रदूषण विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र, कंपनी सर्व अटींची पूर्तता करणार काय, यावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. सोबतच याविरोधात उच्च न्यायालयात याचिका देखील प्रलंबित असल्याने वाढीव उत्खनन वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>> वाघांचे कृत्रिम स्थलांतरण लवकरच; महाराष्ट्रातील पहिला प्रयोग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खाणीत कामावर जाणाऱ्यांना नक्षल्यांची धमकी सूरजागड टेकडीवरील उत्खननास सुरवातीपासूनच नक्षलवाद्यांचा विरोध आहे. यापूर्वीही त्यांनी त्याठिकाणी जाळपोळ केली होती.मात्र, वर्षभरापासून उत्खनन सुरळीत चालू होते. परंतु काही महिन्यांपासून या भागात नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी खाणीत कामावर जाणाऱ्या गावकऱ्यांना धमकी दिली आहे. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून शेकडो गावकरी कामावर गेलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षल्यांचा वरिष्ठ नेता गिरिधर त्या भागात सक्रिय असून त्याने काही गावांमध्ये गावातील प्रमुखांसोबत बैठक देखील घेतल्याचे कळते. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलीस विभागही यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. ते गावागावत जाऊन गावकऱ्यांना सुरक्षेबाबत आश्वस्त करीत असून कामावर जाण्यास सांगत आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.