नागपूर : भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्याजवळ शुक्रवारी पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. माजी आमदार आनंदराव वंजारी यांच्या फार्म हाऊसजवळ अंतरावर पालाडी ते माथाडी रस्त्यावर वाघाचा मृतदेह आढळला. वाघाचा मृत्यू वीजप्रवाहाच्या धक्क्याने झाल्याची दाट शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भंडारा वनक्षेत्रातील निवासी बी-२  हा वाघ ‘रुद्र’ या नावाने ओळखला जात होता. पूर्ण वाढ झालेल्या या वाघाचा मृत्यू गूढ परिस्थतीत झाल्याने वनखात्याचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी वाघाचा मृतदेह आढळला त्या जागेच्या वरून ११ केव्हीची वीजवाहिनी जात आहे. तसेच विद्युत कुंपणासाठी त्याठिकाणी दोन छिद्रे आढळून आली. वाघाच्या अंगावरही वीजप्रवाहाच्या खुणा आढळून आल्या. तसेच या ठिकाणापासून पाच किलोमीटरच्या त्रिज्येत जंगल नाही. आसपास पूर्ण शेती आहे. त्यामुळे या वाघाचा मृत्यू वीजप्रवाहाने झाल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच खरे कारण कळेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, घटनेची माहिती होताच भंडारा वनखात्याचे अधिकारी भलावी, नागलवार व इतर,  पोलीस अधीक्षक वसंत यादव, महावितरणचे अभियंता नाईक, मानद वन्यजीव रक्षक शाहीद खान आदी घटनास्थळी पोहोचले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Excitement finding tiger carcass ysh
First published on: 29-01-2022 at 01:33 IST