ढोंगी, चमत्कारी अंधविश्वास पसरवणाऱ्या बाबांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यांच्यावर दयामाया दाखविण्याची गरज नाही. मात्र, एकाच्या चुकीमुळे समाजात चांगले काम करणाऱ्यांना बदनाम करणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रामदेवबाबा मंगळवारी त्यांच्या पतंजली उद्योग समूहाच्या कामानिमित्त नागपुरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आखाडा परिषदेने जाहीर केलेल्या भोंदूबाबांच्या यादीकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मी देशासाठी काम करीत आहे. एका ढोंगी बाबामुळे संपूर्ण संस्कृती बदनाम होत नाही. अखिल भारतीय आखाडा परिषदेने जी यादी जाहीर केली, त्याबाबत माहिती नाही. मात्र, चुकीचे काम करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, मग तो कोणीही असो. ढोंगी बाबांना लोकांनी जवळ करू नये, असेही रामदेव बाबा म्हणाले.
योगाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी पतंजलीच्या पाच संघटना काम करीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकाच्या धर्तीवर देशभर पूर्णवेळ ६०० योग प्रचारक तयार केले आहेत आणि ते देशभरात योग प्रचाराचे काम करतात. पावसाळ्यात ही संख्या कमी झाली असली तरी हरिद्वारमध्ये नियमित नि:शुल्क वर्ग सुरू असतात, याकडे रामदेव यांनी लक्ष वेधले.
दिग्विजय सिंह यांचे अस्तित्व संपुष्टात
भोंदूबाबांच्या यादीत रामदेव बाबा यांचेही नाव समाविष्ट करावे, अशी मागणी करणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा यावेळी त्यांनी समाचार घेतला. दिग्विजय सिंह यांचे राजकीय, सामाजिक अस्तित्व संपुष्टात आले असून त्यांची माझ्यावर आरोप करण्याची पात्रताही नाही, अशी टीका बाबा रामदेव यांनी केली. त्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची व त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.
फूडपार्क सहा महिन्यात पूर्ण
मिहानमधील पंतजलीचा फूड आणि हर्बल पार्कच्या निर्मितीबाबत काही कायदेशीर अडचणी आल्या होत्या. त्या दूर करून काम सुरू केले आहे. येत्या सहा महिन्यात काम पूर्ण होऊन उद्योग सुरू होईल आणि हजारो लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल . विदर्भातील शेतकऱ्यांना या उद्योगाच्या माध्यमातून न्याय मिळेल, असेही रामदेवबाबा म्हणाले.