अकोला : तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात सध्या मोबाईल ‘जीव की प्राण’ झाला आहे. त्यात तो महागडा असेल तर विचारायलाच नको. पाण्यात बुडालेल्या किंवा अडकलेल्यांचा जीव वाचवण्यासाठी आतापर्यंत आपण ‘रेस्क्यू ऑपरेशन’ राबवल्याचे ऐकले असेल. अकोल्यात मात्र विहिरीत पडलेल्या मोबाईलला वाचवण्यासाठी चक्क २२ तास ‘रेस्क्यू ऑपरेशन’ सुरू होते. पाण्याने भरलेल्या ४० फूट खोल विहिरीत शेतकऱ्याचा पडलेला मोबाईल सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला.
जिल्ह्यातील येळवण गावात हा प्रकार घडला. या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. येळणव येथे ज्येष्ठ छायाचित्रकार पप्पू मोहोड हे शेतातील विहिरीतून झाडांना पाणी देत होते. अचानकपणे वरच्या खिशातील मोबाईल हा विहिरीत पडला. मोबाईल महागडा असण्यासोबतच त्यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती, संपर्क क्रमांक, छायाचित्र, चित्रफिती आदी असल्याने पप्पू मोहोड तणावात आले. त्यांना काय करावे काही सूचेना. मोबाइल विहिरीतून तर काढायचा होताच. त्यांच्या डोक्यात ‘रेस्क्यू ऑपरेशन’ राबवण्याची कल्पना आली.
पिंजर येथील संत गाडगेबाबा शोध व बचाव आपत्कालीन पथकाशी त्यांनी संपर्क साधून येळवण गावात पाचारण केले. विहिरीत शोध मोहीम सुरू झाली. शोध पथकातील पाच जणांकडून दिवसभर विहिरीतील पाण्याच्या तळाशी जात वारंवार शोध घेण्याचा प्रयत्न झाला. विहीर पाण्याने तुडुंब भरल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मोबाईलचा शोध लागणे आव्हानात्मक होते. तरीही रात्रभर शोध मोहीम सुरू होती. पहाटे सहा वाजता ‘स्कुबा डायव्हिंग कीट’ मागविण्यात आली. ‘अंडर वॉटर स्कुबा डायव्हिंग’ अवगत असलेला अंकुश सदाफळे हा विहिरीच्या तळाशी गेला.
पथकाच्या अथक परिश्रमाला यश आले. पप्पू मोहोड यांचा महागडा मोबाईल विहिरीच्या तळाशी आढळला. हा मोबाईल चार दिवस विहिरीतल्या पाण्यात होता. त्यानंतर देखील तो चालू स्थितीत आढळून आला. त्यामुळे मोहोड यांचा जीव भांड्यात पडला. या शोधकार्यासाठी सुमारे २२ तासांचा कालावधी लागला.
आपत्कालीन पथकाचे प्रमुख तथा जीवरक्षक दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनात सहकारी शेखर केवट, अंकुश सदाफळे, निलेश खंडारे, विकास सदांशिव, मयुर सळेदार, ऋषिकेश राखोंडे, सार्थक वानखडे, हर्षल वानखडे, गणेश लेहनकार, सुरज खंडारे, योगेश कुदळे आदींच्या पथकाने विहिरीत मोबाईल शोध मोहीम राबवली. कुठलेही मानधन न घेता पथकाने हे कार्य केल्याने मोहोड यांच्याकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.