अमरावती : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची काही निवडक संघटना बदनामी करण्‍याचा प्रयत्‍न करीत असून त्‍यांच्‍या या कृत्‍याला प्रतिबंध घालावा या मागणीसाठी सोमवारी येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयावर रणजीत गंतूराम पवार यांच्‍या नेतृत्‍वात फासेपारधी बांधवाच्‍या मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले होते.

राणा दाम्‍पत्‍य हे समाजसेवेसाठी समर्पित आहे. दोघांनी प्रत्‍येक पारधी वस्‍तीवर तसेच मेळघाटातील आदिवासी समुदायापर्यंत विकासाच्‍या योजना पोहोचवल्‍या आहेत. फासेपारधी आणि आदिवासी समुदायाच्‍या विकासात त्‍यांचे मोठे योगदान आहे. पण, राणा दाम्‍पत्‍याच्‍या वाढत्‍या लोकप्रियतेचा धसका त्‍यांच्‍या राजकीय शत्रूंनी घेतला असून, जिल्‍ह्यातील काही भाडोत्री संघटनांना हाताशी धरून त्‍यांच्‍याकरवी निषेध मोर्चा काढून राणा दाम्‍पत्‍याची प्रतिमा मलीन करण्‍याचा आणि त्‍यांची बदनामी करण्‍याचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा – नागपूर: जलवाहिनी फुटली, अनेक वस्त्यांचा पुरवठा खंडित होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राणा दाम्‍पत्‍याच्‍या कार्याला फासेपारधी आणि आदिवासी समुदायाचे पूर्णपणे समर्थन आहे, असे निवेदनात म्‍हटले आहे. भाडोत्री संघटनांकडून केले जाणारे गैरप्रकार कायमस्‍वरुपी थांबविण्‍यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणीही त्यात करण्‍यात आली आहे. सोमवारी राणा दाम्‍पत्‍याच्‍या समर्थनार्थ हाती फलक घेऊन फासेपारधी बांधव जिल्‍हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. मोर्चात महिलांची संख्‍या लक्षणीय होती.