महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपद्धतीवर पर्यावरणवाद्यांचे आक्षेप
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणमंडळाने यंदा नागपूरकर ध्वनीप्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करणार असल्याचे भाकित केले होते. बऱ्याच प्रमाणात मंडळाचे हे भाकित खरेही ठरले. मात्र, फटाक्यांच्या चाचणीपासून तर दिवाळीनंतर दिवसा आणि रात्रीच्या प्रदूषणाचे मापदंड लावण्यापर्यंत मंडळाच्या एकूणच कार्यपद्धतीवर पर्यावरणवाद्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
दिवाळीनिमित्त शहरात उपलब्ध फटाक्यांपैकी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ४७ प्रकारच्या आवाजी फटाक्यांची चाचणी दिवाळीपूर्वी घेतली. शहरातील फटाका विक्रेत्यांकडूनच नव्हे तर गोदामातूनही त्यांनी फटाक्यांचे नमुने घेतले. यात त्यांनी १२५ डेसिबलच्या खाली सर्व फटाके असून एकाही फटाक्याने आवाजाची मर्यादा ओलांडली नसल्याचा निष्कर्ष काढला. शहरातील एकूण फटाक्यांच्या दुकानांची संख्या, त्यातील शेकडो पद्धतीचे आवाजी फटाके आणि केवळ ४७ प्रकारच्या फटाक्यांच्या चाचणीवरून असा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केला.
आता दिवाळीनंतरचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रदूषणाचा अहवाल नुकताच दोन दिवसांपूर्वी मंडळाने जाहीर केला. यात त्यांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी फटाके कमी फुटल्याचा आणि पर्यायाने प्रदूषण कमी झाल्याचा दावा केला आहे. या अहवालात त्यांनी रात्री फटाके कमी आणि दिवसा अधिक फटल्याचे सांगितले आहे. मंडळाने शहरात किती फटाके फुटले याचे मापदंड लावताना सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत अशी दिवसाची वेळ गृहीत धरली आहे आणि त्यानंतरचा कालावधी त्यांनी रात्रीच्या कालावधीत गृहीत धरला आहे. वास्तविक कोणत्याही शहरात फटाके रात्री ७ ते १२ वाजेपर्यंत फोडले जातात. मात्र, मंडळाने रात्री १० वाजेपर्यंतचा वेळ सकाळच्या वेळेत गृहीत धरल्याने रात्रीचे तीन तास हे दिवसाच्या वेळेत गृहीत धरल्या गेले. त्यामुळे या कालावधीत फुटलेले फटाके हे दिवसाच्या कालावधीत मोजल्या गेले. शहरातील अजनी चौक वगळता सर्व जागेवर मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी फटाके फुटले. विशेषत: ‘सेलिब्रेशन’साठी ओळखल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरात सर्वात कमी फटाके फोडण्यात आले.
लोक पर्यावरणाप्रती सजग
शहरात फटाके कमी फोडल्या गेले याचाच अर्थ लोक पर्यावरणाप्रती सजग होत आहेत. दुसरी बाब म्हणजे फटाक्यांच्या किंमती एका वर्षांत प्रचंड वाढल्याने पर्यायाने खरेदीही कमी झाली. दिवाळीच्या काही दिवसांपूर्वीच चायनीज वस्तूंच्या विक्रीवर बहिष्काराचा मुद्दा गाजला. त्यामुळे त्याचाही परिणाम फटाक्यांच्या खरेदीवर झाला. २६ ऑक्टोबपर्यंत चायनीज फटाक्यांची विक्री कमी होती. मात्र, अवघ्या दोन दिवस आधी फटाक्यांची खरेदी झाली, कारण बाजारात दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. एकूणच नागपूरकर पर्यावरणाप्रती सजग होत असल्याचा प्रत्यय यंदा फटाक्यांच्या कमी संख्येवरून आला, असा निष्कर्ष ग्रीन विजिल या पर्यावरणवादी संस्थेचे कौस्तुभ चटर्जी यांनी काढला.