scorecardresearch

२० वर्षांपासून पक्ष्यांना खाऊ घालणारा अवलिया

जीव माणसांचाच नाही तर पशुपक्ष्यांचा देखील असतो. भूक त्यांनाही लागते.

Bird Lover
२० वर्षांपासून पक्ष्यांना खाऊ घालणारा अवलिया

नागपूर: जीव माणसांचाच नाही तर पशुपक्ष्यांचा देखील असतो. भूक त्यांनाही लागते. माणूस माणसाला खाऊ घालतो, पण त्या मुक्या जीवांचे काय? एक – दोन महिने नाही तर तब्बल २० वर्षांपासून एक अवलिया शहरातील अंबाझरी उद्यानातील पक्ष्यांना खाऊ घालतो आणि ते पक्षी देखील तेवढ्याच आतुरतेने त्यांची वाट पाहतात. जणू हे मैत्र आयुष्यभरासाठी जडले आहे.

सत्पुरुष वानखेडे हे दुचाकी वाहनांच्या गॅरेजचे मालक. पण त्यांनी त्यांचा व्यवसाय कधी त्या पक्ष्यांच्या भुकेआड येऊ दिला नाही. अगदी करोनाकाळात देखील ते उद्यानात येत होते. दररोज सकाळी गॅरेजमध्ये जाण्याआधी आठ वाजताच्या दरम्यान ते अंबाझरी उद्यानात येतात. त्यांच्या प्रतीक्षेत जणू येथे पक्ष्यांची शाळाच भरली असते. सकाळी ते एका पिशवीतून या पक्ष्यांसाठी खाद्य घेऊन येतात. ते येताच पिशवी उघडण्याआधी पक्षाी त्यांच्या अंगाखांद्यावर येऊन बसतात. मग त्यांच्यात सुरू होतो एक संवाद आणि तो सुरू असतानाच सत्पुरुष वानखेडे त्यांना खाऊ घालतात. तब्बल तास-दीड तास त्यांचा हा संवाद चालतो. सत्पुरुष वानखेडे यांना खरं तर दररोज पक्षांच्या खाद्यावर २०० ते २५० रुपये खर्च करण परवडणार नाही, पण लहानपणापासून जडलेला हा जिव्हाळा त्यांना ते करण्याची ताकद देतो.  कुणी स्वतावून मदत केली तरच ते घेतात. या पक्ष्यांचे आणि त्यांचे हे मैत्र आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत असेच राहील, असे सत्पुरुष वानखेडे सांगतात.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Feeding birds 20 years garden the birds hungry ysh