स्ञिलंपटपणामुळे पत्नी त्रस्त होती

नागपूर : पत्नी व मुलांसह पाच जणांची हत्या करणारा आलोक  माथूरकर हा स्ञिलंपट स्वभावाचा होता व तो महिला वशीकरणाची विद्या शिकत होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यामुळे मेहुणी अमिषा बोबडे ही त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याने तिच्या खुनाचा  कट आखला असेल, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी रात्री आलोकने पत्नी विजया, मुलगी परी, मुलगा साहील, सासू लक्ष्मी बोबडे आणि मेहुणी अमिषा बोबडे यांना अतिशय क्रूरपणे संपवले. त्यानंतर  स्वत:ही आत्महत्या केली. आज सकाळी  सासरे देवीदास बोबडे घरी आले. त्यावेळी पत्नी व मुलीच्या अंगावर चादर टाकली होती. देवीदास यांना वाटले की दोघी झोपल्या असतील. सासऱ्यांनी चहा घेतला, आंघोळ  केली. घरमालकाला भाडे दिले व वीज बिल भरून घरी परतले. पत्नीला उठवण्याचा प्रयत्न केला असता ती रक्तबंबाळ दिसली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना जावयावर संशय आला. त्याला शोधण्यासाठी त्याच्या घराकडे गेले असता तेथे चार मृतदेह सापडले. हे बघून पोलीसही हादरले. घराचा पंचनामा केला असता आलोकचा मोबाईल सापडला. पोलिसांनी ते उघडून त्यातील संभाषण वाचले. तो महिला वशीकरणाची विद्या शिकण्यासाठी अनेकांच्या संपर्कात होता. अशा स्वरूपाच्या काही व्हॉट्सअ‍ॅप समूहाशी जुळला होता. तो यात महिला वशीकरणाच्या चित्रफिती बघायचा. महिलांना वश करून त्यांचा उपभोग घेण्याच्या उद्देशाने तो हे करीत होता, अशी माहिती समोर येत आहे.

या विद्य्ोचा वापर त्याने आपल्या मेहुणी अमिषावर केल्याचे सांगितले जाते. ती त्याच्या जाळ्यात अडकली होती. पण, ती इतर मित्रांच्या संपर्कात असल्याने आलोकला खटकत होते. त्यामुळे अमिषावर बंधन घालत होता. यावरून भांडण झाले व त्याने तिला मारहाण केली. तेव्हा ती त्याच्यापासून लांब गेली. तो पुन्हा तिच्यावर वशीकरणाचा प्रयत्न करीत होता, अशी माहिती समोर आली आहे.

ऑनलाईन चाकू मागवला

आलोकचा खरा चेहरा अमिषासमोर उघड झाला होता.  ती त्याच्यापासून दुरावली होती. त्यामुळे त्याने तिच्या खुनाचा कट अनेक दिवसांपूर्वीच आखला होता. याकरिता ‘स्नॅपडील’ या  संकेतस्थळावरून ऑनलाईन चाकू मागवला होता. त्याच चाकूने त्याने सर्वाचा खून केला.

‘पत्नीने मेंदी लावल्याचा समज’ 

मी सकाळी कामावरून घरी परतल्यानंतर पत्नी व मुलीच्या अंगावर चादर  होती. मला वाटले त्या झोपल्या असतील. पत्नीचा हात लाल दिसत होता. पण, तिने मेंदी लावली असावी, असा माझा समज झाला व मी त्यांना न उठवताच आपली कामे करीत राहिलो.  उशीर झाला तरी पत्नी न उठल्याने मी तिच्या अंगावरील चादर उचलली असता ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती व मुलीचा मृतदेहही विवस्त्र होता, अशी  माहिती देवीदास बोबडे यांनी दिली.

 

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Female enchantment nagpur crime ssh
First published on: 22-06-2021 at 02:25 IST