‘फेस्कॉम’चा आक्षेप
ज्येष्ठ नागरिकांचा मुलींना त्रास होत असल्यास त्यांनी बसच्या चालक व वाहकाकडे तक्रार न करता ज्येष्ठांवर दोषारोपण केले आहे. असे करून ज्येष्ठांना मिळणारी बस सवलत बंद पाडण्याचाच हा सामाजिक कट असल्याचा आक्षेप महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाने (फेस्कॉम) घेतला आहे.
‘विद्यार्थिनींना तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांचाच त्रास’ या शीर्षकाची बातमी ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केली. शिक्षणासाठी सीमालगत भागातून शहरात सार्वजनिक बसने ये-जा करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींना तरुणांपेक्षा आंबटशौकिन म्हाताऱ्यांकडूनच त्रास होत असल्यामुळे विद्यार्थिनींनी स्वतंत्र बसची मागणी केल्याचे एका सर्वेक्षणांतर्गत पुढे आले. ‘महाविद्यालयीन मुली आणि नागपूर शहर सार्वजनिक बस सेवा’ या विषयावरील हे सर्वेक्षण मॉरिस महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्यावतीने करण्यात आले. शहरातील शासकीय विज्ञान संस्था, जी.एस. वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय, धनवटे नॅशनल महाविद्यालय, आर.एस. मुंडले महाविद्यालय, एलएडी महाविद्यालय आणि मॉरिस कॉलेज अशा सहा महाविद्यालयांत हे सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक महाविद्यालयांतून ५० नमूने गोळा करण्यात आले. या सर्वेक्षणाचा आधार घेऊन ५ मे रोजी बातमी प्रकाशित करण्यात आली होती.
त्यावर मत देताना, खेडय़ातून येणाऱ्या तरुणींना ज्येष्ठ नागरिकांकडून त्रास होतो, असे म्हणणे संयुक्तिक नाही. शहरापेक्षा खेडय़ातील ज्येष्ठ नागरिकच जास्त समजूतदार, अनुभवी, मोलाचा सल्ला देणारे व सन्माननीय आहेत, असे ‘फेस्कॉम’ने म्हटले आहे. सकाळी सात वाजता ज्येष्ठ नागरिक बसने प्रवास करणाऱ्या मुलींची छेडखाणी करतात, तेव्हा बसमध्ये चालक व वाहक उपलब्ध असतात. त्यांच्याकडे तक्रार करून त्या ज्येष्ठाला बस थांबवून रस्त्यात उतरवणे सहज शक्य आहे. नियमानुसार वाहक व चालक ही कारवाई करू शकतात. परंतु या मुलींनी तसे केले नाही. कारण एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने मुले व मुली सार्वजनिक स्थळी, सार्वजनिक वाहनात नको नको ते हावभाव व चाळे करतात, त्याला आक्षेप घेतला असावा व त्यामुळे सदर मुलीने ज्येष्ठांवर खोटे आरोप लावले व सर्वच ज्येष्ठांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. यात त्या तरुणीचे आई-वडील, काका, मामा व त्यांच्या घरातील, गावातील, प्रवास करणारे सहप्रवासी सर्वच ज्येष्ठ आले, याकडे संघटनेने लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बस सवलत बंद पाडण्याचा कट -रेवतकर
शासनाने ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत दिली. एखाद्या ज्येष्ठाने चांगले वागण्याचा सल्ला तरुणीला दिला असावा. अनैतिक कृत्ये करताना कोणत्याही व्यक्तीला रोखल्यास त्याचा वचपा काढण्याकरता, ज्येष्ठांची बस सवलत बंद करण्याकरता हा सामाजिक कट असावा, असे फेस्कॉमचे सचिव सुरेश रेवतकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. आजकाल सार्वजनिक बगिचे, सार्वजनिक इमारती, मोकळी जागा अशा अश्लील व अनैतिक कृत्याकरता वापरण्यात येतात. त्यावर कोणाचा मालकी हक्क नसतो. म्हणून अनैतिक कृत्ये करणारी व्यक्ती लगेच दुसऱ्या व्यक्तीला उलटसुलट बोलतात. मुलींच्या मते, तरुण मुलांचा प्रवासात त्रास नसतो. याचाच अर्थ तरुण असले की कसेही वागायचे. महिलांना रेल्वेमध्ये स्वतंत्र डबा आहे, तशी स्वतंत्र बस असावी. याबाबत आमचे दुमत नाही. सीसीटीव्ही कॅमेरे बसवून प्रश्न सुटणार नाही. कारण एटीएममध्येही सीसीटीव्ही कॅमेरे असूनही रोख रकमेची चोरी होते. तक्रार नोटबुक बसमध्ये उपलब्द असून सुशिक्षित समाज त्याचा उपयोग करीत नाही. तोंडी तक्रारही वाहकाकडे करीत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Female students complaint against senior citizens is conspiracy to close benefits
First published on: 11-05-2016 at 02:54 IST