नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाच्या अखिल कुणबी संघटनेने काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन समाजाच्या बैठकांमधून केले होते. त्यामुळे समाजाची बहुतांश मते काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या वाट्याला जातील असे दिसते. परिणामी भाजपचे नितीन गडकरी यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर लोकसभेसाठी मतदान झाले आणि या मतदारसंघात कोण विजयी होईल, याची प्रचंड उत्सुकता देशभर निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे नागपुरात भाजपाची मातृसंस्था आणि वैचारिक मार्गदर्शक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. तसेच या शहरात बौद्ध धम्माचे पवित्र स्मारक दीक्षाभूमी आहे. या शहरात सर्वच जाती-धर्माचे आणि विविध प्रातांचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. परंतु निवडणुकीत जात प्राबल्य कायमच प्रभावी ठरले आहे. यावेळी तर बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाच्या अखिल कुणबी संघटनेने काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन समाजाच्या बैठकातून केल्याने गडकरींच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : नागपूर विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी जर्मनीहून!

नागपूर लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी दोन काँग्रेसकडे आहेत. तर चार भाजपाकडे आहेत. या मतदारसंघात ५० टक्क्यांपेक्षा अधिक ओबीसी समाजाचे मते आहेत. त्यात प्रामुख्याने कुणबी आणि तेलींचा आकडा सर्वांधिक आहे. यापैकी कुणबी समाजाचे सुमारे सव्वाचार ते साडेचार लाख मते आहेत. त्यापैकी सुमारे ४० हजार मते बावणे कुणबी यांची असल्याचे सांगण्यात येत आहे. दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी निवडणुकीच्या काही महिने आधी बावणे कुणबी समाजाला सभागृह बांधण्यासाठी भूखंड आणि निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे हा समाजाने भाजपाला मतदान केल्याचा अंदाज आहे. तरी देखील बहुतांश कुणबी समाज काँग्रेसच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेत गोंधळ, विद्यार्थी परीक्षेसाठी केंद्रावर गेले अन् असा प्रकार घडला की…..

गेल्या निवडणुकीत कुणबी समाजाने भाजपला साथ दिली होती. यावेळी हा मतदार काँग्रेसकडे परत आल्याचे सांगण्यात येत आहे. अखिल कुणबी संघटनचे राजेश काकडे यांनी नागपूर लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याच्या काही दिवस आधी संघटनेच्या बैठका झाल्याचे आणि कोणत्या पक्षाच्या उमेदवाराच्या पाठिंशी समाजाने उभे राहायचे याबाबत स्पष्ट भूमिका घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.