‘हेमचंद्रई’ नामकरण, नवेगाव बांध उद्यानात वावर
सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करून त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नांची गरज आहे हे ओळखूनच गेल्या १५ वर्षांपासून विदर्भातील सरपटणाऱ्या प्राण्यांवर संशोधन सुरू आहे. या दरम्यान विज्ञानापासून अनभिज्ञ असलेल्या पालीच्या हॅमीडॅक्सलस गुणसूत्राच्या नव्या प्रजातीचा शोध डॉ. आशीष टिपले व पराग दांडगे यांनी लावला. २८ सप्टेंबरला रशियन जर्नल ऑफ हार्पिटोलॉजीत त्यांचा शोधनिबंध प्रकाशित झाला.
भारतात पालींच्या हॅमीडॅक्सलस गुणसूत्राच्या २६ प्रजातींच्या पालीची नोंद आहे, तर जगभरात १२२ प्रजाती आहेत. यातीलच नवी प्रजाती या दोन्ही संशोधकांनी शोधली असून, त्याला ‘हेमचंद्रई’ असे नाव दिले आहे. भंडारा जिल्ह्य़ातील नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या प्रादेशिक विभागातील प्रतापगड रेंजमधील प्रजापगड किल्ल्याजवळ त्यांना ही पाल आढळली. या परिसरात ही पाल मोठय़ा प्रमाणावर आढळते. २००६ ते २०१४ या दरम्यान मध्य भारतातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाच्या विविध विभागांत सर्वेक्षण करण्यात आले. वन खाते, बफर क्षेत्र, नदी, तलाव आणि आसपासच्या परिसरात पावसाळ्यात आणि त्यापूर्वीच संशोधन झाले. ही पाल दिसायला सामान्य पालीसारखी असली तरीही तिचे गुणधर्म वेगळे असतात. दिवसा ही प्रजाती गडद तपकिरी आणि रात्री फिकट तपकिरी होते. दिवसाच्या तुलनेत रात्री ही पाल अधिक कृतिशील असते. हेमीडॅक्सलस गुणसूत्राच्या प्रजातीतील ही सर्वात श्रीमंत पोटजात आहे. जगाच्या उष्ण प्रदेशात आणि महासागराच्या बेटांवर ती दिसून येते. या प्रजाती मोठय़ा संख्येने असल्या तरीही दक्षिण आशिया आणि आफ्रिकेत त्या तुलनेने कमी आहेत. ही प्रजाती कीटकावर भक्षण करत असून, आग्यामोहळ हे या पालीचे आवडीचे खाद्य आहे. उबदार हवामानात आणि दगडांच्या प्रदेशात ही अधिक राहणे पसंत करते. या पालीचे नामकरण पराग दांडगे यांचे वडील हेमचंद्र दांडगे यांच्या नावावरून ‘हेमचंद्रई’ असे करण्यात आले. भविष्यातही विदर्भात पालींच्या नवीन प्रजाती मिळू शकतात, पण त्यासाठी अधिक काम करण्याची गरज आहे, असे मत डॉ. आशीष टिपले यांनी व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Sep 2015 रोजी प्रकाशित
पालीच्या नव्या प्रजातीचा शोध
भारतात पालींच्या हॅमीडॅक्सलस गुणसूत्राच्या २६ प्रजातींच्या पालीची नोंद आहे,
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
Updated:
First published on: 30-09-2015 at 00:14 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finding a new species of lizards