वंधत्वाचे प्रमाण वाढण्याचे एक प्रमुख कारण; डॉ. योगेश्वर नंदनवार यांचा दावा

नागपूर, विदर्भासह राज्यात महिलांमध्ये ‘पीसीओटी’चा आजार वाढत आहे. प्रत्येक पाच पैकी एका महिलेला हा आजार असल्याचे अभ्यासात पुढे येत आहे. या रुग्णांमध्ये वंधत्वाचे प्रमाण इतरांहून जास्त आहे, असा दावा के.ई.एम. रुग्णालयाचे प्रसिद्ध डॉ. योगेश्वर नंदनवार यांनी केला. श्रीखंडे टेस्ट टय़ूब बेबी व सरोगेसी केंद्राच्या वतीने आयोजित ‘आययूआय’च्या कार्यशाळेकरिता नागपूरला आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

[jwplayer dxIMjswX]

बैठी जीवनशैली, खानपानाच्या वाईट सवयी, कमी होणारे श्रम, ताणतणाव, बदलती जीवनशैली यामुळे महिलांमध्ये पीसीओटी (पॉलिसिस्टीक ओव्हरेन सिंड्रम) हा आजार वाढत आहे. या आजारामुळे महिलांमध्ये हार्मोनल इनबॅलेन्स होण्यासह त्यांची मासिक पाळी अनियमित होण्याचे प्रमाण वाढत आहे. या आजाराच्या महिलांमध्ये मधुमेह, शरीराच्या कोणत्याही भागात त्वचेवर केस असणे, महिलेला गर्भाशयाचा कर्करोग असणे यासह इतरही आजार संभवतात. सुमारे तीस ते चाळीस वर्षांपूर्वी वैद्यकीय अभ्यासक्रम करताना विद्यार्थ्यांना हा आजार जास्त आढळत नसल्याने तो वाचनातून शिकवला जात होता, परंतु हल्ली प्रत्येक पाच पैकी एका महिलेला हा आजार आढळत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

सडपातळ महिलेच्या तुलनेत लठ्ठ महिला वा मुलींमध्ये तो जास्त आढळतो. या आजाराला मुलींचे तिसीनंतर विलंबाने लग्न होणे, फास्ट फूड व जंक फूडसह शीतपेयाचा वाढता वापर, खाण्यात रासायनिक प्रक्रियेने पिकवले जाणाऱ्या भाजीपाल्यासह फळांचा वाढत्या वापरासह इतरही अनेक कारणे जबाबदार आहे. प्रत्येक महिलेने घाम निघेपर्यंत व्यायाम करणे, खाणपानात संतुलन आणण्यासह इतर काळजी घेतल्यास हा आजार टाळता येत असल्याचेही डॉ. नंदनवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, डॉ. अनिल श्रीखंडे उपस्थित होते.

चौतीस टक्के महिलांमध्ये अ‍ॅनिमिया

शहरी व ग्रामीण भागातील महिलांवर झालेल्या अभ्यासात जवळपास ३४ टक्के महिलांमध्ये अ‍ॅनिमिया आढळला आहे. रक्तात हिमोग्लोबीन कमी असणे, खाणपानात न्यूट्रिशियनचे प्रमाण कमी असणे यासह इतर अनेक कारणांनी हा आजार संभवतो. खाण्यात झिंकाचे प्रमाण कमी व बैठी जीवनशैली यासह इतरही अनेक कारणांनी हा आजार वाढत आहे. मोबाईलसह लॅपटॉपचा वाढता वापर, कामामुळे वाढत्या तणावामुळेही दांपत्यातील संवाद हरवत चालला असून वंधत्व वाढत असल्याचे दिसत आहे. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांनीही वंधत्वाचे प्रमाण हल्ली महिला व पुरुषांमध्ये प्रत्येकी ५० टक्के झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

[jwplayer VwmkQGEJ]