जोरदार पावसाने पूर्व विदर्भातील १४८ गावांना पुराचा तडाखा बसला आहे. २७ हजार ७२१ पूरग्रस्तांपैकी १८ हजार २६१ लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

पूरग्रस्तांसाठी विविध ठिकाणी ८३ छावण्या उघडण्यात आल्या असून ‘एनडीआरएफ’ची एक, ‘एसीआरएफ’च्या तीन तुकडय़ा आणि लष्कराची बचाव पथके लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आणि पुरातून बाहेर काढण्याचे काम करत आहेत.

पूर्व विदर्भात शनिवारपासून पूरस्थिती आहे. नागपूर जिल्ह्य़ातील ५१, गडचिरोली जिल्ह्य़ातील ४, चंद्रपूर जिल्ह्य़ातील ६, भंडाऱ्यातील ५७ आणि गोंदियातील ३० अशा १४८ गावांतील २७,७२१ ग्रामस्थांना पुराचा फटका बसला आहे.

नागपूर जिल्ह्य़ातील १४ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ात पोलिसांचे एक आणि तीन जिल्हा बचाव पथकांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू केले आहे. बचावासाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येत आहे. गडचिरोलीतील ब्रह्मपुरी-आरमोरी, गडचिरोली-चामोर्शी, देसाईगंज -लाखांदूर, चंद्रपूर-आलपल्ली मार्ग बंद आहेत.

भंडारा जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्य़ाच्या शहरी भागांसह ग्रामीण भागांनाही पुराचा फटका बसला आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी लाखांदूर तालुक्याचा दौरा करून खैरना, मोहरना गावातील पूर परिस्थितीची पाहणी केली.