‘मिसिंग टायगर जय’मधून साध्य काय?
राज्यातल्या एका अभयारण्यातील जगप्रसिद्ध वाघ बेपत्ता झाल्यानंतर गांभीर्याने त्याची शोधाशोध दूरच, पण आपापल्या परीने प्रत्येकजण त्याचा प्रसिद्धीसाठी करून घेत असलेला वापर ही त्या वाघाबद्दलची शोकांतिकाच म्हणावी लागेल. उमरेड-करांडला अभयारण्याला ओळख मिळवून देणाऱ्या ‘जय’ या वाघावर आधारित ‘मिसिंग टायगर जय’ हा प्रयोग निश्चितच चांगला होता, पण या प्रयोगातून नेमके काय साध्य करायचे होते कळायला मार्ग नव्हता. मात्र, या नाटिकेतून वनबल प्रमुखांच्याच उपस्थितीत उघडपणे वनखात्यातील अधिकाऱ्यांची उडवली गेलेली खिल्ली, वनखात्यावर साधला गेलेला निशाना आणि त्यावर वनबल प्रमुखांचे मौन या मागचे कारण समजू शकले नाही.




नागझिरा अभयारण्यातून उमरेड-करांडला अभयारण्यात स्थलांतरण केल्यानंतर ‘जय’ अल्पावधीतच पर्यटकांचा लाडका झाला. त्यामुळे ‘सेलिब्रेटीं’नासुद्धा त्याला बघण्यासाठी उमरेड-करांडला अभयारण्यात यावे लागले. त्याच्या भटकंतीचा वेग आणि शिकाऱ्यांपासून त्याला होणारा धोका पाहता त्याला ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आली.
एप्रिल २०१६ च्या मध्यान्हापासून कॉलर बंद पडल्यानंतर तब्बल सहा महिने होत आले असतानाही संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना अजूनपर्यंत त्याचा शोध घेता आला नाही. किंबहूना ‘तो’ जिवंत आहे म्हणून नव्हे तर मृत आहे म्हणून त्याचा शोध घेण्याची तसदीही या अधिकाऱ्यांनी दाखवली नाही, हे वास्तव आहे. मात्र, बेपत्ता वाघावर नाटय़प्रयोग सादर करण्यामागचा उद्देश कुणालाच कळला नाही. ‘जय’चे असणे आणि त्याचे बेपत्ता होणे हे अजूनही प्रसिद्धीच्याच वलयात आहे. त्यामुळे हा नाटय़प्रयोग म्हणजे त्या प्रसिद्धीच्या वलयात स्वत:लाही झोकून देण्याचा प्रकार तर नव्हता ना, अशीही चर्चा या प्रयोगानंतर सभागृहाबाहेर रंगली होती. केवळ एक नाटय़प्रयोग म्हणून ही कलाकृती आणि त्यातील अभिनय निश्चितच चांगला होता, पण वास्तविकतेवर आधारित नाटय़प्रयोग सादर करताना त्यामागील साध्य रसिकप्रेक्षकांना उलगडायला हवे, जे या नाटय़प्रयोगातून अजिबात उलगडले नाही. या नाटय़प्रयोगाला पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) सर्जन भगत, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, राष्ट्रवादीचे अजय पाटील व्यासपीठावर होते.
* नाटय़प्रयोगाच्या सुरुवातीला आणि नाटय़प्रयोगानंतर संयोजक असलेले अजय पाटील ‘जय’चा उल्लेख वारंवार ‘बब्बर शेर’ असा करत होते. मात्र, ‘बब्बर शेर’ हे वाघाला नव्हे तर सिंहाला म्हणतात, हे कदाचित पाटील यांना ठाऊक नसावे. त्यावरही वन्यजीवप्रेमींनी सभागृहाबाहेर उघडपणे बोलून दाखवले.
* या नाटय़प्रयोगात उमरेड-करांडला अभयारण्याशी संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांची व ‘जय’ला ‘रेडिओ कॉलर’ लावणाऱ्या भारतीय वन्यजीव संस्थानच्या वैज्ञानिकांची पात्रे रंगवण्यात आली. मात्र, ‘शेट्टी’, ‘बुचे’, ‘जमाल’ या आडनावामागून रंगवलेल्या व्यक्तिमत्त्वामागे कोणाचे व्यक्तिमत्त्व होते, हे सभागृहातील उपस्थितांना ठाऊक असल्याने हास्याचे कारंजे उडत होते.