scorecardresearch

चंद्रपूर वीज केंद्राकडून मालमत्ता करापोटी मिळालेला ४ कोटी ८७ लाखाचा निधी बाबुपेठ उड्डाणपुलाकरिता द्यावा ; काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी

महानगरपालिका हद्दीत येणाऱ्या बाबुपेठ उड्डाणपूल करीता ६१.५७ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.

चंद्रपूर:महानगरपालिकेत भाजपाची साडेसात वर्षे सत्ता होती. मात्र या कालावधीत भाजपा महापौर तथा लोकप्रतिनिधींनी महापालिकेला देणे असलेले पाच कोटी रूपयांपैकी एक नवा पैसा दिला नाही. आता काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्राकडून मालमत्ता करापोटी मिळालेले ४ कोटी ८७ लाख रूपये बाबुपेठ पुलासाठी देण्यात यावे, जेणे करून बाबुपेठ निवासी नागरिकांची रेल्वे गेट मुळे होत असलेली गैरसोय येत्या काळात दूर होईल अशी मागणी प्रशासक तथा आयुक्त राजेश मोहिते यांना निवेदन देवून केली आहे. दरम्यान कॉग्रेसच्या या मागणीने भाजपाची कोंडी झाली आहे. महानगरपालिका हद्दीत येणाऱ्या बाबुपेठ उड्डाणपूल करीता ६१.५७ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या पैकी १६.३१ कोटी रूपये रेल्वेने, ५ कोटी चंद्रपूर महापालिकेने व ४०.२६ कोटी रूपये राज्य शासनाने द्यावयाचा होते. मागील साडेसात वर्षापासून महापालिकेत भाजपाची सत्ता होती. मात्र या पुलाला एक नवापैसा दिला नाही. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. तेव्हा महापालिकेने पाच कोटी रूपये द्यावे अशी मागणी कॉग्रेसचे माजी नगरसेवक डॉ. सुरेश महाकुलकर, माजी शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नंदू नागरकर, माजी नगराध्यक्षा तथा माजी नगरसेविका सुनीता लोढीया, माजी नगरसेविका संगीत भोयर, शलिनी भगत, घनशाम वासेकर, सुरेश खपणे, राजेंद्र आत्राम, अरविंद मडावी, विशाल भगत, बिकास टीकादर, मनोज वासेकर शाम राजूरकर सुरेश आत्राम यांनी आयुक्त राजेश मोहिते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. भाजपाच्या जेष्ठ नेत्यांनी या पुलाचे उदघाटन वारंवार केले. मात्र उडाणपूल बांधकाम करीता द्यावयाचा वाटा दिलेला नाही. फक्त आपल्या प्रभागात रस्ते, नाली व स्वागत गेट बांधकाम मध्ये कोट्यावधी निधी खर्च केले. सत्तेचा गैरफायदा घेत भाजपा महपौरांनी राजकीय दबाव टाकून एकाच प्रभागात दिड कोटीची कामे कार्यकाळ संपायच्या एक दिवस अगोदर स्थायी समितीच्या सभेत निविदा मंजूर केल्या. परंतु ज्या उडाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यास शहरातील बाबुपेठ निवासी असलेली नागरिकांच्या दळण-वळण चा मोठा प्रश्न मार्गी लागू शकतो त्या करीता निधी देण्याची यांची मानसिकता नाही. काँग्रेस नगरसेवक व काँग्रेस कार्यकर्ते यांनी सोमवारी महापालिका प्रशासक व आयुक्त राजेश मोहिते यांची भेट घेवून निवेदन देत पाच कोटीचा निधी बाबुपेठ उड्डाणपुलासाठी देण्याची मागणी केली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार तथा काँग्रेस नगरसेवकांच्या प्रयत्नाने चंद्रपूर् वीज केंद्र कडून प्राप्त झालेली कर राशि ४.८७ लक्ष हे बाबुपेठ उडाणपूल निर्मिती करीत द्यावे जेणे करून बाबुपेठ निवासी नागरिकांची रेल्वे गेट मुळे होत असलेली गैरसोय येत्या काळात दूर होईल. प्रशासक व आयुक्त मोहिते यांनी ही बाब मान्य केली. चंद्रपुर महानगरपालिकेला ५ कोटी निधी उडाणपूल निर्मिती करीत द्यायचे होते. पण ते दिले नाही. लवकरच हा निधी देऊ असे त्यांनी मान्य केले नागरिकांच्या हिता करीत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former congress corporators demand commissioner to provide funds for babupeth flyover zws

ताज्या बातम्या