गडचिरोली : काँग्रेसमध्ये उमेदवारी वाटप करताना पैशांचे निकष लावण्यात आले. असा गंभीर आरोप करून काँग्रेसच्या आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. गडचिरोली – चिमूर जागेसाठी उत्सुक होते. परंतु उमेदवारी डावलल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

गडचिरोली काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य उफाळून आले आहे. डॉ. चंदा व डॉ. नितीन कोडवते यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. त्यामुळे येथे काँग्रेसला दुसरा धक्का बसला आहे. काँग्रेसने डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर केल्याने नाराज असलेले डॉ. उसेंडी यांनी काँगेस नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. तिकीट वाटपासाठी पक्षात पैशांचा निकष लावल्याचा दावा त्यांनी २६ मार्च रोजी केला आहे. डॉ. नामदेव उसेंडी यांनी काँगेस आदिवासी प्रदेशाध्याक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा अद्याप दिला नसून कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा >>>रामटेकमध्ये ठाकरे गटात बंड, सुरेश साखरे अपक्ष लढणार

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, संदीप सुरजागडे आदी उपस्थित होते. डॉ. उसेंडी हे २००९ मध्ये काँग्रेसकडून गडचिरोली विधानसभा मतदासंघांतून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ व २०१९ अशा दोन्ही वेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले, पण त्यांना यश आले नाही. दरम्यान, तिसऱ्यांदा ते काँग्रेसकडून इच्छुक होते, पण त्यांना डावलून प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान यांना संधी देण्यात आली. त्यामुळे नाराज असलेले डॉ. उसेंडी यांनी काँगेस आदिवासी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या  प्रदेश पातळीवरील नेत्यांवर गंभीर आरोप केले. पैशांच्या जोरावर उमेदवारी वाटप केली जात असल्याची आपल्याला शंका असल्याचा आरोप त्यांनी केला. दोन वरिष्ठ नेत्यांच्या गटबाजीत कुरघोडीच्या राजकारणातून आपल्याला डावलले गेले, असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कामाचा व्याप वाढल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला असावा. त्यांचे आरोप प्रदेश पातळीवरील नेत्यांवर आहेत, तेच उत्तर देतील. – महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हाध्यक्ष काँगेस