अकोला : संभाजी ब्रिगेड पक्षाचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी यांना गैरव्यवहार करणे चांगलेच भोवले आहे. जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे डॉ. गजानन पारधींना एका महिलेने चक्क चपलेनेच मारहाण केल्याची घटना कॅमेरात कैद झाली आहे. इतर लोकांनीही त्यांना मारहाण केल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वीची ही घटना असल्याचे बोलल्या जात असून पोलिसात मात्र या प्रकरणाची तक्रार झालेली नाही. या घटनेची चित्रफित आता समाज माध्यमातून चांगलीच प्रसारित झाली. दरम्यान, संभाजी ब्रिगेड पक्षाने डॉ. गजानन पारधी यांना अगोदरच पक्षातून कायमस्वरूपी बडतर्फ केल्याचे आदेश मे महिन्यातच काढण्यात आले होते. या सर्व प्रकरणासंदर्भात डॉ. पारधी यांच्याशी संपर्क साधला असता सध्या कुठलीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडणार आहे, असे त्यांनी सांगितले.

अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभाजी ब्रिगेड पक्षाच्या एका माजी पदाधिकाऱ्यांनी महिला व इतरांसोबत अनेक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अखेर त्याचा उद्रेक होऊन महिला व इतर नागरिकांनी त्यांना चांगलाच चोप दिल्याचे समोर आले आहे. मूर्तिजापूर येथे काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून त्याची चित्रफित आता समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. डॉ. गजानन पारधी यांना मूर्तिजापूर येथे एक महिला चक्क चपलेने मारहाण करताना दिसत आहे. यावेळी मोटारीमध्ये एका व्यक्तीने डॉ. पारधी यांना धरून ठेवले असून त्या महिलेला उपस्थित इतर पुरुष मारहाणीसाठी प्रोत्साहित करीत असल्याचे देखील चित्रफितीमध्ये दिसते. दरम्यान, या प्रकरणात कुठलीही पोलीस तक्रार झाली नसल्याने गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

संभाजी ब्रिगेड पक्षातून कायमस्वरूपी बडतर्फ; मे महिन्यातच कारवाई

डॉ. गजानन पारधी हे संभाजी ब्रिगेड पक्षात कार्यरत होते. त्यांच्याकडे प्रदेश कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी होती. त्यांच्या विरोधात पक्षातील वरिष्ठांकडे अनेक तक्रारी झाल्या. त्याची गंभीर दखल घेत संभाजी ब्रिगेड पक्षाचे अध्यक्ष मनोज आखरे यांच्या स्वाक्षरीने ५ मे रोजी काढलेल्या पत्राद्वारे डॉ. पारधी यांच्यावर कारवाई करण्यात आली. पक्षाच्या आचारसंहितेचे पालन करण्यात कसूर केली. पक्षविरोधी कारवाई आणि गैरवर्तन करीत पक्ष संघटनेची प्रतिमा डागाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याबद्दल कायमस्वरुपी बडतर्फ करण्यात येत असल्याचे पत्रात नमूद आहे. यापुढे पक्षाचे नाव वापरू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील डॉ. गजानन पारधी यांना पत्रातून देण्यात आला आहे.