बुलढाणा : भरगर्दीच्या जयस्तंभ चौकात ‘ते’ दोघे भिडले. त्यांची फ्रिस्टाईल पाहायला गर्दी जमा झाली. दोघेही हार मानायला तयार नव्हते, ना वाहने ना दुखापतीची पर्वा. अखेर काही नागरिकांनी ‘जलास्र’ वापरून हा तंटा मिटविला. हे वर्णन ऐकून कुणाला वाटलं की हे गुंडाचं भांडण असावे तर हा अंदाज चुकीचा आहे! कारण हे भांडण होत दोन मस्तवाल सांडांचे! मंगळवारी संध्याकाळी भरवाहतुकीच्या जयस्तंभ चौकात हा सामना रंगला. दोन सांड एकमेकांना भिडले, ताकद लावून धडका मारायला लागले. वीस मिनिटांच्या आसपास ही ‘फ्रिस्टाईल’ चालली. यामुळे मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांची तारांबळ उडाली.
अनेकजण जागीच उभे राहून दोघांची झुंज पाहत जागीच खिळले. एकमेकांना मागे रेटत नेणाऱ्या या बैलोबांनी अख्ख्या चौकाला हन्यास आणला. मग काही जाणकारांनी दोघा गरम व घामाघूम झालेल्या सांडावर थंड पाण्याचा मारा केला. मग मात्र या दोघांनी तिथून पळ काढला. एका पठ्ठ्याने हा नजारा मोबाईल मध्ये कैद केला. सध्या समाज माध्यमावर काय ‘व्हायरल’ होईल हे सांगणे कठीण. या बैलोबांची टक्करबाजीही बुलढाण्यापुरती का होईना, सोशल मिडीयावर वेगाने सार्वत्रिक झालीच.