अमरावती : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले असून आता पुन्हा एकदा आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद रंगला आहे. आमदार रवी राणा यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभय आहे. त्यामुळे रवी राणा सातत्याने काहीही बोलतात. नुकतात त्यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला. जर तो खरा असेल, तर त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी आपण पोलिसांकडे करणार आहोत. रवी राणांच्या वक्तव्यामुळे अनेकवेळा पक्ष अडचणीत सापडतो, त्यामुळे फडणवीस यांनी रवी राणांना आवर घालावा, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केल्यानंतर रवी राणांनी देखील त्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा >>> शिक्षिकेच्या घरी मध्यरात्री पोहोचली सीबीआयची चमू, चौकशीत जे आढळले……
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी गेल्या बारा वर्षांपासून काम करीत आहे. सुख-दु:खात आम्ही सोबत आहोत. बच्चू कडू मात्र कधी इकडे, कधी तिकडे जाताना दिसतात. निवडणुकीआधी सर्व नेते माझ्या विरोधात उभे ठाकतात. माझा पराभव करण्यासाठी जोरकस प्रयत्न करतात, मात्र मी जनतेच्या पाठिंब्यावर निवडून येतो. मुळात देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना आवर घालण्याची गरज आहे. सरकारला त्यांनी आजवर अनेकवेळा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका रवी राणांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. बच्चू कडू यांना मंत्रीपद हवे आहे. आपण मात्र कधीही मंत्रीपद मागितलेले नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत आहोत, असे रवी राणा म्हणाले.