सुरक्षेचा प्रश्न, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकल्याने अडचणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानेवाडा घाटाच्या प्रवेशद्वाराला फाटक नसल्याने येथे गुन्हेगारांचा वावर असतो. घाटाकडे जाणाऱ्या मार्गावरच बांधकाम साहित्य टाकल्याने अंत्ययात्रा नेण्यासाठी नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागतो.

दोन सुरक्षा रक्षकांसह पाच कर्मचारी घाटावर नियुक्त केले आहेत. तेथे प्रवेशद्वाराला फाटक नाही. त्यामुळे मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे. गुन्हेगारांचाही तेथे वावर असतो. ते सुरक्षा रक्षकाला दमदाटी करतात. त्यांना आवर घालण्यासाठी महापालिका किंवा स्थानिक लोकप्रतिनिधीकडून फारसे सहकार्य मिळत नसल्याचे घाटाच्या एकूण पाहणीवरून दिसून येते.

नरेंद्रनगर, हुडकेश्वर, पिपळा फाटा, म्हाळगीनगर, आशीर्वादनगर, महालक्ष्मीनगर, ओमनगर, बेसा आदी वस्त्या घाट परिसरात आहेत. महिन्याला साधारणपणे दोनशेवर अंत्यसंस्काराचे विधी येथे होतात. आतमधील परिसर मोठा आहे. येथे एकूण ११ दहन ओटे आणि एक शोकसभागृह आहे. यापैकी निम्म्या ओटय़ांची अवस्था चांगली नाही. ते उखडलेले आहेत. त्यामुळे सरण रचण्यात अडचणी येतात. आगारातून दहन घाटापर्यंत लाकडे नेण्यासाठी गाडी नाही, त्यासाठी  पैसे मोजावे लागतात. विसाव्याच्या ठिकाणी विद्युत दिवे नाहीत, रस्तेही उखडलेले आहेत. संपूर्ण मार्गच रात्री अंधारात असते. शोकसभागृहात अस्वच्छता असते. तेथील टेबल तुटलेले आहेत. बाजूच्या नाल्यातील घाण आत येते. त्यामुळे दरुगधी पसरलेली असते.  अंत्यविधीसाठी आलेल्यांना बसता येईल, अशी जागा, पिण्याच्या पाण्यासाठी नळ नाही, हातपंप आहे. हिंदू, बौद्धांव्यतिरिक्त त्याठिकाणी ख्रिश्चन लोकही दफनविधीसाठी येतात.

दहन ओटय़ावरील खड्डे राख काढून काढून खोल गेले आहेत. दहनाबरोबरच त्याठिकाणी आता डिझेल वाहिनीचेही काम सुरू होणार आहे. पार्थिव जाळण्यासाठी साडेसात मण लाकडे आणि १० किलो गोवऱ्या पुरवल्या जातात. लाकडाचा तुटवडा कधी नसतो.

परिसरातील नागरिकांना त्रास

घााटाकडे जाणारा मार्ग मोकळा आणि अडथळा विरहित असावा म्हणून गावाबाहेर स्मशानभूमी असायची. मात्र, चहुबाजूंनी वाढणाऱ्या शहरामुळे घाटच आता शहरात आलेले आहेत. साहजिकच आजूबाजूला दाट लोकवस्ती झाल्याने अंत्ययात्रा भर वस्तीतून न्यावी लागते. त्याचा त्रास अंत्ययात्रेतील लोकांबरोबरच वस्तीतील नागरिकांनाही होतो. मुलांना अंगणात खेळणे कठीण होते किंवा एखादा कार्यक्रम करणे फारच अडचणीचे होते.

इतर घाटांच्या तुलनेत आमच्या येथे स्वच्छता आणि इतर सोयी आहेत. मृत्यू प्रमाणपत्राची एक प्रत घाटावरूनच दिली जाते.

सुनील गजभिये, कर्मचारी

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funeral issue nagpur
First published on: 25-11-2017 at 02:23 IST