देवेश गोंडाणे

टाळेबंदीमुळे सर्व परीक्षांवर अनिश्चिततेचे सावट आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अंतर्गत समिती देशपातळीवर परीक्षांसंदर्भात एकसूत्री कार्यक्रमाचा अभ्यास करीत आहे. मात्र, करोनाचे वाढत असलेले रुग्ण, त्यामुळे देशभरात वाढविण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे परीक्षा नेमक्या कधी होतील? होतील की नाही? या प्रश्नांमध्ये राज्यातील विविध अभ्यासक्रमातील उच्च व तंत्रशिक्षण घेणाऱ्या ३२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

राज्यात १६ मार्चपासून टाळेबंदी जाहीर होताच विद्यापीठांच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. मात्र, टाळेबंदीचा कालावधी पुन्हा वाढवण्यात आल्याने विद्यार्थी तणावात आहेत. परिणामी, विद्यापीठांचे मदत केंद्र, समुपदेशन केंद्राकडे परीक्षेसंदर्भात विचारणा करण्यासाठी रोज शेकडो फोन येत आहेत. टाळेबंदी उठली तरी परीक्षा होणार की नाही, या विवंचनेत प्रशासन, विद्यार्थी आणि पालकही आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अध्यक्षतेखाली ६ एप्रिल रोजी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन परीक्षा व शैक्षणिक वेळापत्रक ठरवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार समितीची बैठक १४ एप्रिल रोजी झाली. त्यामध्ये विद्यापीठीय परीक्षा, तसेच शैक्षणिक वेळापत्रक कसे असावे, याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये विविध अभिप्राय देण्यात आले. मात्र, विद्यापीठीय शिक्षणातील अध्यापन, परीक्षा व संशोधन यातील गुणवत्ता राखण्यासंदर्भात समन्वय व देखरेख ठेवण्याचे काम यूजीसी करीत असते.

विद्यापीठ व महाविद्यालयीन परीक्षा संदर्भात यूजीसीने आपला अहवाल केंद्र शासनास सादर केल्यानंतर यूजीसीच्या शिफारशी व राज्यस्तरीय समितीच्या शिफारसीच्या आधारे परीक्षा घेणे, तसेच पुढील शैक्षणिक वेळापत्रकासंदर्भात राज्य शासनामार्फत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, यूजीसीच्या समितीचा अहवाल अद्यापही आलेला नाही. त्यामुळे परीक्षेसंदर्भात अनिश्चितता आहे.

राज्यातील एकूण परीक्षार्थी  

राज्यात ३२५८ महाविद्यालयात चालू शैक्षणिक सत्रामध्ये ३१.९५ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात पदवी, पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांसह तंत्रशिक्षण घेणाऱ्या २ लाख ४५ हजार तर मुक्त विद्यापीठामधील ७ लाख विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या ३२ लाख विद्यार्थ्यांमध्ये १४ लाख ३५ हजार विद्यार्थिनी आहेत.

परीक्षांचा पर्याय : विद्यापीठांमध्ये एक हजार ते बाराशेच्या घरात परीक्षा होतात. टाळेबंदी उठली तरी एवढय़ा विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे अशक्य आहे. त्यामुळे केवळ अंतिम वर्षांची परीक्षा घ्यावी अशा सूचना आहेत. उन्हाळी आणि हिवाळी परीक्षा समाविष्ट करून नोव्हेंबरमध्ये एकत्रित घ्याव्या अशा सूचना आहेत. यासह ऑनलाइन आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने परीक्षा घेण्याचा पर्यायही निवडला जाऊ शकतो.

जेईई, नीट परीक्षार्थीही बुचकाळ्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा(एनईईटी) अंतर्गत जेईई आणि नीट परीक्षा घेतली जाते. जेईई मेन्स परीक्षा ५ ते ११ एप्रिल आणि ३ मे रोजी होणारी वैद्यकीय पात्रता परीक्षा ‘नीट’ पुढे ढकलण्यात आली आहे. दरवर्षी राज्यातून ४ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. मात्र, टाळेबंदीमुळे याही परीक्षांवर आता अनिश्चिततेचे सावट आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाची समिती देशपातळीवर परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तणावात राहण्याचे कारण नाही. टाळेबंदीच्या करोनाच्या काळात घरी राहून अभ्यास करावा.

– डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, अध्यक्ष, एआयसीटीई