नंदा पैठणकर यांचे मनोगत
कधी कोणाकडे न जाणारे, फारसे कुठेही न मिसळणारे मात्र सगळ्यांशी पत्र व्यवहाराच्या माध्यमातून संवाद साधत आपलेसे करणारे, अबोल, संयमी व्यक्तिमत्व असलेले गुरुनाथ आबाजी कुळकर्णी उपाख्य जीए हे त्यांच्या साहित्यातूनही तसेच प्रतिभाषित होतात. दिवाळी अंकात त्यांच्या कथा असत, तेव्हापासून घरातील लोकांना त्यांचे लेखन कळायला लागले. प्रारंभी कौटुंबिक कथांचे लेखन करताना ते अचानक गूढ कथांकडे कसे वळले हे आजपर्यंत कुणालाच कळले नाही, असे मत जीएंच्या मावस भगिनी नंदा पैठणकर यांनी व्यक्त केले. त्यांच्या साहित्यावर फार काही बोलता येणार नाही. मात्र, बहिणीवर माया आणि नितांत प्रेम ठेवणारा भाऊ आणि समाजात वावरणारा एक साहित्यक म्हणून जीए एक गूढ व्यक्तिमत्त्व होते, असेही त्या म्हणाल्या.
मनस्वी मनाचा तळ शोधणाऱ्या गूढ कथांनी मराठी साहित्यात आपले वैशिष्टय़पूर्ण स्थान निर्माण करणारे जी.ए. कुळकर्णी यांची कथा म्हणजे एक अनामिक, अनोळखी गूढ पण तितक्याच रम्य विश्वासला प्रवास, गूढ व्यक्तिमत्त्व आणि गूढ प्रतिकांमधून धावणारी पण वास्तवाशी जवळचे नाते सांगणारी त्यांची कथा. मराठी साहित्य विश्वाला वैशिष्टय़पूर्ण स्थान निर्माण करून देणारे जी.ए. कुळकर्णी यांच्या स्मरणार्थ साहित्य संघाच्या संकुलात ‘प्रवेश जीएंच्या विश्वात’ हा अभिनव आणि आगळावेगळा कार्यक्रम सादर करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. नंदा पैठणकर यांची मुलाखत नितीन सहस्त्रबुद्धे यांनी घेतली.
जीएंच्या कौटुंबिक वाटचालीपासून ते साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केल्याच्या घटनेपर्यंतचा रहस्यमय प्रवास उलडगडण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. आईवडिलांनी जेवढे सांभाळावे त्याहूनही जास्त प्रेम देत बाबूअण्णाने बहिणींना सांभाळले. महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक असले तरी मराठी विषयाचे अध्यापन करीत होते. जीए ज्या महाविद्यालयात अध्यापन करीत होते, त्या महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी ते शक्य नव्हते आणि त्याला ते आवडत नव्हते. मैत्रीणी त्यांच्या शिकवण्याच्या शैलीबद्ध पद्धतीने विश्लेषण करायचे तेव्हा मी बाबूअण्णाशी पैज लावली होती. महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकली नाही तरी एक दिवस तुझ्या वर्गात येऊन बसेल म्हणून त्याच्याशी पैज लावली होती. बाबूअण्णा शिकवताना मुलींकडे पहात नव्हता, त्यामुळे मैत्रीणींच्या सांगण्यावरून त्याच्या वर्गात बसली होती. घरी गेल्यावर त्या घटनेचे वर्णन त्यांच्यापुढे केले तेव्हा मी पैज जिंकली आणि त्यांच्याकडून शंभर रुपये वसूल केले, अशी आठवण त्यांनी सांगितली.
जीए कथाकार होते. सुरेख कलात्मक चित्रकार आणि मूर्तीकार होते. चांगला स्वयंपाक ते करीत होते. मुगाच्या डाळीची आमटी हा त्यांचा आवडता पदार्थ होता. आम्हा बहिणींवर त्यांचे नितांत प्रेम होते. बहिणीवर शस्त्रक्रिया होणार होती आणि त्याचवेळी बाबूअण्णाला अमेरिकेची शिष्यवृत्ती मिळाली होती. एक वर्ष त्या ठिकाणी राहावे लागणार होते. मात्र, केवळ बहिणींसाठी त्यांनी अमेरिकेला जाणे टाळले आणि त्याबाबत अखेपर्यंत काहीच सांगितले नाही की कोणाजवळ बोललेसुद्धा नाहीत.
‘ते’ इतके आत्मकेंद्री का होते?
बाबूअण्णाच्या काजयमाया या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला तेव्हा तो पुरस्कार स्वीकारण्यासही ते तयार नव्हते. मात्र, केवळ आमच्यासाठी त्यांनी तो स्वीकारला. काही तांत्रिक कारणामुळे साहित्यक्षेत्रातून त्यावेळी त्याला विरोध झाला. त्यांनी रोख रकमेसह आणि प्रवासाच्या खर्चासह परत केला. साहित्य अकादमीने तो परत घेण्यास नकार दिला. अखेर जीएंच्या हट्टामुळे अकादमीने तो परत घेतला. पुरस्काराच्या यादीतून नाव मात्र काढले नाही. त्यावरही ज्येष्ठ समीक्षक भालचंद्र नेमाडे यांनी आक्षेप घेतला होता. परंतु जीएंवर प्रेम आणि श्रद्धा ठेवणाऱ्यांनी जीएंनी तो पुरस्कार परत केल्याचे दाखले दिले होते. तो वाद मिटला होता. त्यावेळी त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. ते आजारी पडले होते. ते सहसा कुणासोबत मिसळत नव्हते किंवा त्यांच्याकडे कुणाचे येणेजाणे नव्हते. परंतु पत्र व्यवहार इतका दांडगा असताना ते इतके आत्मकेंद्री का होते, असा प्रश्न आजही अनेकांना पडतो, असेही त्या म्हणाल्या.