नागपूर, पुणे, : ‘मंगल मूर्ती मोरया’चा जयघोष, आसमंतात घुमणारा ढोल-ताशांचा गजर, चौकांचौकांत काढण्यात आलेल्या आकर्षक रांगोळय़ा, रंगीबेरंगी फुलांनी सजविण्यात आलेल्या पालख्या आणि रथात विराजमान झालेले गणराय, अशा उत्साही आणि मंगलमय वातावरणात विदर्भासह राज्यभरात बुधवारी गणरायाचे आगमन झाले. मुखपट्टीची सक्ती नसल्याने गणेशभक्तांनी मोकळा श्वास घेत मिरवणुकांचा आनंद लुटला.

मागील दोन वर्षे करोनामुळे साजरा होऊ न शकलेल्या गणेशोत्सवाला विदर्भात बुधवारपासून उत्साहात सुरुवात झाली. सकाळपासूनच वाजतगाजत गणरायाचे आगमन झाले. राजकीय नेत्यांच्या घरीही विधिवत गणपतींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. बाजारपेठांमध्येही उत्साह होता. विदर्भातील  सार्वजनिक गणेशोत्सव,  मंडळांकडून करण्यात येणाऱ्या विविध देखाव्यांसाठी जसा प्रसिद्ध आहे तशीच त्याला अनेक वर्षांची परंपराही आहे.

भोसलेवाडय़ात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली. सांयकाळी काही ठिकाणी पावसाच्या सरी आल्या. पण, त्यामुळे उत्साहावर कोणताही परिणाम झाला नाही. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक मंडळाचे गणपती वाजत गाजत येणे सुरूच होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निवासस्थानी गणपतीची पूजा करण्यात आली. वर्धेत सावंगी मेघे येथील गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. तेथे भाजप नेते व माजी खासदार दत्ता मेघे यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. अमरावतीतही उत्साहाचे वातावरण होते. अकोल्यात काही मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. चंद्रपुरात गणरायाच्या जयघोषात सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीचे आगमन झाले. संपूर्ण विदर्भात गणेशोत्सवामुळे उत्साहाचे वातावरण आहे.

  यंदा निर्बंधमुक्तीमुळे राज्यभरात गणेश मंडळांनी  दिमाखात वाजत-गाजत प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका काढल्या. मानाच्या गणपतींसह प्रमुख सार्वजनिक मंडळे, गृहनिर्माण सोसायटय़ा तसेच घराघरांत गणरायाचे आगमन झाल्याने सर्वाच्या आनंदाला उधाण आले होते.  गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी सकाळपासूनच मंडळांची लगबग सुरू झाली होती. मुहूर्तावर प्रतिष्ठापना करण्यासाठी बहुतांश मंडळांनी जाहीर केलेल्या वेळेत मिरवणुकांना प्रारंभ केला. ढोल-ताशा पथकांच्या वादकांनी वादनासह केलेल्या गणरायाच्या जयघोषाला उपस्थितांनीही प्रतिसाद दिला. पुण्यामध्ये मानाच्या गणपतीसह प्रमुख मंडळांनी विधिवत गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली.

– आनंद आणि उत्साहाचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवामध्ये कोणतेही संकट येऊ नये यासाठी पोलीस दक्ष असल्याने  प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका निर्विघ्न पार पडल्या.

– पुण्याच्या गणेशोत्सवातील आनंदाची अनुभूती घेण्यासाठी विविध देशांतून मोठय़ा प्रमाणावर आलेल्या परदेशी पाहुण्यांनी प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत सहभाग घेतला. या उत्सवातील वेगळेपण त्यांनी मोबाइलमध्ये टिपले. काही परदेशी पाहुण्यांनी पारंपरिक वेश परिधान केला होता.

– पुणे शहरातील विविध गणेश कार्यशाळांतून मूर्ती घेऊन जाण्यासाठी सकाळपासूनच लहान-मोठय़ांची लगबग सुरू होती. नागरिकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता.