बुलढाणा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी यंदा १३ जून २०२४ रोजी आषाढी वारीसाठी पंढरपूर करिता मार्गस्थ होणार आहे. सकाळी ७ वाजता भक्तीमय वातावरणात धार्मिक सोपस्कार पार पाडून श्रींची पालखी संत नगरी शेगावातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करेल.
यंदा पालखीचे ५५ वे वर्ष असून शेगावहून जाताना ३३ दिवसांची पायदळ वारी करीत वारकरी पंढरीत दाखल होणार आहेत. १३ जून रोजी सकाळी ७ वाजता ७०० वारकरी भक्तांसंगे श्री संत गजानन महाराजांची पालखी विठ्ठलाच्या पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे. पहिल्या दिवशी दुपारी नागझरी व रात्री पारस येथे मुक्काम राहील. ३३ दिवसांच्या प्रवासात पालखी ठिकठिकाणी मुक्कामी राहणार आहे. ऊन पावसाची तमा न बाळगता आणि शेकडो किलोमीटरचे अंतर करून १५ जुलै रोजी पालखी श्रीक्षेत्र मंगळवेढावरून विठुरायाच्या पंढरीत दाखल होणार आहे. पंढरपूर येथे १७ जुलै रोजी आषाढी सोहळा आटोपून पाच दिवसांच्या मुक्कामी राहणार आहे.
हेही वाचा – यवतमाळ : संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना कक्षात डांबले, काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर
परतीचा प्रवास
नंतर २१ जुलैपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे. पुन्हा २२ दिवसांचा पायदळ परतीचा प्रवास करीत श्रींच्या पालखीचे ११ ऑगस्ट रोजी स्वगृही प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या शेगाव नगरीत आगमन होईल. परतीच्या प्रवासात अंतिम टप्प्यात ही पालखी खामगाव येथे मुक्कामी राहणार आहे. वारीला जाऊ न शकणारे भाविक खामगाव ते शेगाव दरम्यान पालखीत मोठ्या संख्येने सहभागी होतात. ही परंपरा आता उत्सव झाला आहे.