न्यायालयात नेण्याच्या सबबीखाली एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीला दुसऱ्याच ठिकाणी नेऊन तिचा विनयभंग केल्याची तक्रार प्राचार्याकडे करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयातील अंतिम वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने प्राध्यापकाने गैरवर्तन केल्याची तक्रार प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार यांच्याकडे केली असून तिचे पालकही प्राचार्याना भेटून गेले.

प्राध्यापकाविरुद्ध तक्रार केल्याने मुलीच्या गुणांवर त्याचा परिणाम होईल, अशी भीतीही व्यक्त केली आहे. अंतिम वर्षांतील मुले न्यायालयात जातात. त्यावेळी दोन गाडीवर जाण्यापेक्षा एकाच गाडीवर जाणे त्यांना सोयीचे वाटते. नेहमीप्रमाणे ही मुलगी न्यायालयात जाणार होती व तिला घेण्यासाठी प्राध्यापक कारमध्ये आले. रोजचेच जाणे असल्यामुळे शंका घ्यायला वाव नव्हता. मात्र, प्राध्यापकाने न्यायालयात घेऊन न जाता तिला ‘लाँग ड्राईव्ह’वर नेले. त्यावेळी प्राध्यापकाने तिच्याशी केलेल्या गैरवर्तनाची तक्रार तिने प्राचार्याकडे दिली आहे.

प्राचार्य डॉ. कोमावार यांनी विद्यार्थिनीशी प्राध्यापकाने गैरवर्तन केल्याचे मान्य केले असून ‘लाँग ड्राईव्ह’वर घेऊन जाणे चुकीचे होते. तसेच  या संदर्भात चौकशी करून तथ्य जाणून घेण्यात येईल आणि दोषी आढळल्यास कोणालाही पाठीशी घालणार नसल्याचे त्यांनी सांगितले.